लखनऊ ( वृत्तसंस्था ) – 45 दिवसांपूर्वी लग्न झालेल्या पत्नीनं फोनवर वाद झाल्यावर हाताची नस कापून पतीला व्हिडिओ कॉल केला, त्यानंतर पतीनं आत्महत्या केली लखनऊमधील परसादी खेडा, पारा येथे राहणाऱ्या विवेक प्रसादचे लग्न 29 नोव्हेंबर रोजी डुडा कॉलनीत राहणाऱ्या रितूसोबत झालं होतं. विवेकचे वडील गोकर्ण यांनी सांगितलं की, तो सकाळी ड्युटीवर गेला होता आणि गोकर्ण यांची पत्नी संगीता घरी होती.
2 जानेवारी रोजी सून रितू तिच्या मामाच्या घरी गेली होती आणि तेव्हापासून ती तिथेच होती. रितूने शुक्रवारी दुपारी विवेकला फोन केला होता आणि त्यावेळी दोघांमध्ये काही गोष्टीवरून वाद झाला.
नंतर रितूने ब्लेडने तिच्या हाताची नस कापली आणि विवेकला व्हिडिओ कॉल केला. दुसरीकडे व्हिडीओ कॉलवर पत्नीची अवस्था पाहून विवेक अस्वस्थ झाला आणि खोलीत त्याने गळफास लावून जीवन संपवलं. गच्चीवर बसलेल्या आईनं छतावरून खाली येऊन विवेकचा मृतदेह पाहिला असं पोलिसांचं म्हणणं आहे.
विवेकची आई गच्चीवरून खाली आल्यावर घरच्यांना हा प्रकार कळला. त्यांना खोलीत मुलगा लटकलेला अवस्थेत दिसला आणि त्यानंतर त्यांनी लोकांना बोलावलं. नातेवाईकांनी स्थानिक लोकांच्या मदतीने विवेकचा मृतदेह खाली उतरवून लोकबंधू रुग्णालयात नेला. मात्र डॉक्टरांनी विवेकला रुग्णालयात मृत घोषित केलं.