यवतमाळ ( प्रतिनिधी ) – उमरखेड येथे 11 जानेवारीरोजी डॉ हनुमंत धर्मकारे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे उमरखेडच्या शासकीय रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आरोपींना अटक झाल्याने उलगडा झाला आहे.
आरोपीचा सुगावा लागत नसल्याने मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
एका रुग्णाचा दोन वर्षांपूर्वी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा राग आरोपींच्या डोक्यात होता. त्यामुळे डॉ धर्मकारे यांची हत्या करण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. मे 2019 मध्ये शेख अरबाज शेख अब्रार याचा उमरखेड शहरातील शिवाजी चौक जवळ मोटार सायकलने अपघात झाला होता. अरबाज गंभीर जखमी झाला होता. त्याला शासकीय रुग्णालय उमरखेड येथे दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान जखमी अरबाजचा मृत्यू झाला. त्या वेळेस डॉ हनुमंत धर्मकारे कर्तव्यावर होते.
त्यांच्या हलगर्जीपणामुळे जखमीचा मृत्यू झाला असा नातेवाईकांनी आरोप केला होता. तो वाद पोलिसांत देखील गेला मात्र त्यावेळेस मृतकाचा लहान भाऊ एजाज अब्रार शेख आणि इतर नातवाईकांनी डॉक्टरला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली होती.
सीसीटीव्हीमध्ये दिसत असलेला संशयित हा शेख एफाज शेख अब्रार याच्या सारखा शरीरयष्टीचा दिसत असल्याने पोलिसांनी खबरीकडून माहिती काढली. असता एफाज उर्फ अप्पू शेख अब्रार याने मामा आणि मित्रांच्या साहाय्याने डॉक्टरवर गोळया झाडून हत्या केल्याचं पुढे आले. आपल्या मृत भावाचा वचपा काढण्याच्या उद्देशाने डॉक्टरची हत्या केली.
पोलिसांनी सैय्यद तौसिफ सय्यद खलील, सय्यद मुश्ताक सय्यम खलील, शेख मौहसीन शेख कयुम, शेख शाहरुख शेख आलम यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी वेगवेगळ्या मार्गाने तपास करून अखेर आरोपींना अटक केली आहे.