पारोळ्याच्या “त्या” घटनेतील महिलेची ओळख पटली
पारोळा (प्रतिनिधी) :- पारोळ्यातून एक धक्कादायक घटना मंगळवारी समोर आली होती. वाकड्या पुलाजवळ ४८ वयाच्या अनोळखी महिलेने जाळून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेतील महिलेची ओळख पटली असून महिला पारोळा शहरातील कजगाव रस्त्यावरील राहणारी आहे. त्यांचे पती मुख्याध्यापक असून ते घटनेप्रसंगी जळगावात एका शासकीय बैठकीला गेलेले होते. याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पारोळा कजगाव रस्त्यावरील वाकड्या पुलाखाली एका अज्ञात महिलेने वय अंदाजे ३५ ते ४० वर्ष स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतल्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी १३ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली होती. पारोळा पोलिसांनी या महिलेची ओळख पटविण्याचे आवाहन केले होते. भर दुपारच्या सुमारास बिसलेरी बॉटल मध्ये पेट्रोल भरून आणून वाकड्या पुलाजवळ भोसले पोल्ट्री फार्मच्या शेजारी स्वतःच्या अंगावर टाकून दगडावर बसून जाळून घेत आत्महत्या केली. तिच्या अंगावर लाल कलरची साडी वेगवेगळे ठिपके असलेली, गळ्यात मंगळसूत्र, पायात चप्पल अशी सुशिक्षित घराण्यातील महिला असल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसून आले.
सदर महिलेचे नाव कविता राजू मोरे (वय ४८, रा. सोनार नगर, कजगाव रोड, पारोळा) असे आहे. त्यांचे पती राजू उत्तम मोरे हे तालुक्यातील बोळे येथील महाराणा प्रताप विद्यालयात मुख्याध्यापक असून त्यांना १ मुलगा व १ मुलगी असा परिवार आहे. मंगळवारी राजू मोरे हे जळगावात गेले होते. तर मुलेदेखील बाहेर होती. घरात कविता मोरे एकटीच होत्या. त्यावेळी त्यांनी वाकड्या पुलाजवळ जाऊन अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतले. त्यांना मानसिक आजार असून त्यांच्यावर २०१५ पासून धुळे येथील उपचार सुरु होते. पोलीस निरीक्षक सुनील पवार, पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पारोळा पोलिस करीत आहेत.