कजगाव , ता भडगाव ( प्रतिनिधी ) – पिके हाती येण्याच्या टप्प्यावरच जोरदार पावसाने झोडपल्यामुळे झालेले नुकसान मोठे आहे त्यामुळे चाळीसगाव , भडगाव आणि पाचोरा तालुक्यात सरकारने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरत आहे.
कजगावसह परीसरात दोन दिवस पावसाने जोरदार झोडपले होते जोरदार पावसामुळे अतिवृष्टी सारखीच परिस्थिती निर्माण झाली कजगाव व परिसरातील संपूर्ण शेतात पाणी साठले आहे शेतातील सर्वच पिके जास्त पाण्यामुळे खराब झाली पाण्यामुळे खराब झालेल्या पिकांची स्थिती पाहता बळीराजा रडकुंडीला आला आहे तब्बल चार वेळा आलेल्या महापुरामुळे शेतकऱ्यांची सर्वच गणिते बिघडली आहेत हातातोंडाशी आलेला घास अतिपावसाने हिरावून नेला आहे शेतातील कापसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे कापसाची बॉंडे पावसात वाहून गेली आहेत.
मकाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे सर्वच पिके जमीनदोस्त झालेली दिसून येतात केळी लिंबू विविध फळबागही संकटात आहेत झालेले नुकसान पाहता राज्य शासनाने त्वरीत ओला दुष्काळ जाहिर करावा अशी मागणी जोर धरत आहे नुकसानीची स्थिती पाहून त्वरीत ओला दुष्काळ जाहीर झाल्यास शेतकऱ्यांना काही प्रमाणावर धीर मिळेल.
शासनाने झालेले नुकसान पाहता शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज आहे अगदी होता तोंडाशी आलेला घास अतिवृष्टीमुळे गेला आहे शेतातील सर्वच पिके खराब झाली आहेत त्यामुळे शासनाने त्वरित ओला दुष्काळ जाहीर करावा असे कजगावचे शेतकरी अनिल पवार यांनी सांगितले.
दोन दिवस आलेल्या अतिवपावसाने सर्वच पिके खराब झाली आहेत दोनच दिवसात सर्व चित्र पालटून टाकले मोठ्या अपेक्षेने शेतातील पिकाकडे पाहत होतो मात्र आता जमीनदोस्त झालेल्या पिकांकडे उघड्या डोळ्यांनी पाहण्याची हिंमत होत नाही त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या भावना जाणून लवकरच मदत जाहीर करावी असे हिलाल वाघ यांनी सांगितले.