ममुराबादमध्ये लेंडी नाल्याला पूर; ४० घरांमध्ये पाणी शिरले
महसूल प्रशासनाची तातडीने धाव; नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर, जीवितहानी टळली

जळगाव | प्रतिनिधी
जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथे सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे लेंडी नाल्याला मोठा पूर आला असून परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुराचे पाणी गावातील सुमारे ४० घरांमध्ये शिरल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच महसूल प्रशासन, ग्रामपंचायत आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. पूरग्रस्त घरांमधील नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले असून सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती प्रशासनाने दिली.
प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष
पूरग्रस्त भागात महसूल विभाग आणि स्थानिक प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार मदत व बचावकार्य सुरू असून प्रभावित कुटुंबांना तातडीची मदत उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे.
नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
सततच्या पावसामुळे नदी-नाले आणि ओढ्यांच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने नागरिकांनी अनावश्यकपणे पूरग्रस्त भागात जाणे टाळावे, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.









