मुंबई (वृत्तसंस्था) – श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील लाटे वस्तीवर शनिवारी रात्री जागेच्या वादातून झालेल्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. गणेश गवळीराम साळवे (वय 28, रा. जोशी वस्ती, निपाणी वडगाव) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
लोटेवस्ती येथे वायकर व साळवे यांच्यात जागेवरून अनेक वर्षे वाद सुरू आहे. त्यावरून अनेकदा दोन कुटुंबांचे भांडणे झाली होती. शनिवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास पुन्हा वाद झाला. वादाचे रुपांतर मारामारीत झाले. राजू गांगुर्डे, डॅडी वायकर, राजू वायकर, शरद वायकर यांच्यासह 10 ते 12 जण तलवार, गावठी कट्ट्यासह साळवे यांच्या अंगावर धावून गेले. यावेळी गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्यात आला. साळवे यांच्या छातीत गोळी घुसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. काही तरुणांनी त्यांना तातडीने साखर कामगार रुग्णालयात आणले. त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून सहा जणांना अटक केली आहे.