मुंबई (वृत्तसंस्था) – लातूरमधील निलंगा तालुक्यातील मौजे बोळेगाव येथे उत्तर प्रदेशातून आलेल्यांना शेतात होम क्वारंटाईनमध्ये राहण्याचा सल्ला देणाऱ्या काका -पुतण्यांची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी दिलेल्या सल्ल्यातून वाद झाला आणि त्यात दोघांना जीव गमवावा लागला आहे.
कासारशिरसीजवळ असलेल्या बोळेगाव येधे विद्यमान तातेराव बरमदे हे उत्तर प्रदेशातून आले होते. बाहेरच्या राज्यातून आल्यामुळे कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता असल्याने सुरक्षिततेसाठी तुम्ही घरी थांबू नका, शेतात जाऊन रहा. शेतात काही दिवस होम क्वारंटाईन व्हा, असे गावातील नातेवाईक आणि गावकरी यांनी बरमदे यांना सांगितले. काहीही झाले तरी आपण गावातच राहणार, शेतात जाणार नाही किंवा होम क्वारंटाईनमध्येही राहणार नाही, असे बरमदे यांनी सांगितले. त्यानंतर रात्री उशिरा बरमदे यांनी बोळेगाव व चांदोरी येथील नातेवाईकांना एकत्र करून शहाजी पाटील यांच्या घरावर दगडफेक केली.
विद्यमान बरमदे, अविनाश दत्तू माने, गणेश दत्तू माने, दत्तू रावसाहेब माने (सर्व राहणार बोळेगाव) यांच्यासह भरत सोळूंके, सचिन भरत सोळूंके, नितीन भरत सोळूंके, बिभिषण सोळूंके (राहणार चांदोरी ) रात्री एकत्र आले. विद्यमान बरमदे गावातच राहतील पाहू कोण काय करते ते, असे सांगत या जमावाने पाटील यांच्या घरावर दगडफेक करण्यास सुरूवात केली. तसेच जमावाने चाकू, रॉड, काठ्यांनी पाचील यांच्यावर हल्ला केला. यात शहाजी किसन पाटील( वय 50) आणि वैभव बालाजी पाटील( वय 24) या चुलत्या पुतण्याची भोसकून हत्या करण्यात आली. अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, उपअधीक्षक निलेश देशमुख, कासार सिरसीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डमाले यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपअधीक्षक निलेश देशमुख पुढील तपास करत आहेत.