जळगाव तालुक्यातील आसोदा येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील आसोदा येथे महिलेची छेड काढण्याच्या कारणावरून एका ईसमाला जमावाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवार दि. ४ जुलै रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली.
भास्कर दगडू भंगाळे (वय ४३, रा. असोदा ता. जळगाव) असे मयत ईसमाचे नाव आहे. तो आसोदा गावात पत्नी व मुलासह राहत होता. मजुरी करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. दरम्यान गुरुवारी दि. ४ जुलै रोजी आसोदा गावातील गोकुळ नगर येथे तो गेला होता. (केसीएन)त्यावेळेला मुलीची छेड काढल्याच्या संशयावरून काही महिला व पुरुषांनी त्याला जाब विचारला. यानंतर काहींनी त्याला थेट मारहाण करायला सुरुवात केली.
या मारहाणीमध्ये भास्कर भंगाळे हे गंभीर जखमी झाले. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे पोलिसांनी उपचारासाठी दाखल केले असता त्याला वैद्यकीय अधिकारी डॉ अश्विन देवचे यांनी तपासून मयत घोषित केले.(केसीएन)दरम्यान घटनेप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक महेश शर्मा यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच शासकीय रुग्णालयात येऊन घटनेची माहिती जाणून घेतली. दरम्यान, या घटनेबाबत आसोदा गावामध्ये खळबळ उडाली असून तालुका पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.