नवीन तिकीट घराजवळ घडली घटना; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग आटोक्यात
जळगाव (प्रतिनिधी):- शहरातील रेलवे स्टेशन जवळ रविवारी सकाळी कोळसा वाहतूक करणाऱ्या मालगाडीच्या एका बोगीला अचानक आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली. ही घटना उड्डाण पुलाजवळील नवीन तिकीट घराच्या परिसरात घडल्याने काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.


मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळकडून जळगावकडे येणाऱ्या कोळशाने भरलेल्या मालवाहू रेल्वेच्या पाचव्या बोगीतून अचानक धूर निघत असल्याचे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. यानंतर स्टेशन प्रबंधक एस. एस. ठाकूर यांनी सकाळी सुमारे ११ वाजून ४० मिनिटांनी शिवाजीनगर अग्निशमन केंद्राला तातडीने माहिती दिली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशमन दलाचे जवान तात्काळ बंबासह घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाचे वाहन चालक किरण महाजन, फायरमन शिवाजी तायडे आणि मनोज पाटील यांनी तातडीने आग विझवण्याची मोहीम हाती घेतली. त्यांच्या प्रयत्नांमुळे आग काही वेळातच पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात यश आले.
दरम्यान, ही घटना गजबजलेल्या नवीन तिकीट घर परिसरात घडल्याने आग पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. प्राथमिक माहितीनुसार, कडक उन्हामुळे निर्माण झालेली अंतर्गत उष्णता किंवा कोळशामधील घर्षणामुळे आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.









