गेंदालाल मिल परिसरातून ‘भोमपाली’ पोलिसांच्या जाळ्यात; २५ हजारांचे गावठी पिस्तूल जप्त
जळगाव (प्रतिनिधी):- शहरात दहशत माजवून कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक केला आहे. जळगाव शहर आणि एमआयडीसी परिसराची डोकेदुखी ठरलेल्या आणि तब्बल ५८ गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या एका टॉपच्या सराईत गुन्हेगाराच्या स्थानिक गुन्हे शाखेने गेंदालाल मिल परिसरातून मुसक्या आवळल्या आहेत. विजय वसंत अहिरे उर्फ भोमपाली (वय ३२) असे अटक करण्यात आलेल्या अट्टल गुन्हेगाराचे नाव असून, त्याच्याकडून पोलिसांनी २५ हजार रुपये किमतीचे घातक गावठी पिस्तूल जप्त केले आहे.

गुप्त माहितीच्या आधारे थरारक सापळा
गेंदालाल मिल परिसरात ‘भोमपाली’ हा बेकायदेशीररीत्या गावठी पिस्तूल कंबरेला लावून फिरत असून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याची अत्यंत गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळाली होती. माहिती मिळताच कोणतीही वेळ न दवडता एलसीबीच्या पथकाने २ जुलै रोजी गेंदालाल मिल परिसरात तातडीने धाव घेत गुप्तपणे वेढा दिला. दबा धरून बसलेल्या पथकाने अचूक वेळ साधत संशयित विजय अहिरे याला घेरून अत्यंत थरारक वातावरणात ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तूल मिळून आले.
आरोपीवर खूनाचा प्रयत्न, दरोड्यासह ५८ गुन्हे दाखल
अटक करण्यात आलेला विजय अहिरे उर्फ भोमपाली हा साधासुधा गुन्हेगार नसून जळगाव पोलिसांच्या रेकॉर्डवरील अत्यंत सराईत आणि अट्टल गुन्हेगार आहे. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, त्याच्याविरुद्ध जळगाव शहर पोलीस ठाणे आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न करणे, दरोड्याची पूर्वतयारी करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, गंभीर मारहाण करणे, दंगल घडवणे आणि शस्त्र बाळगणे (आर्म्स अॅक्ट) यांसारखे एकूण ५८ गंभीर गुन्हे दाखल आहेत. या कारवाईमुळे जळगावमधील गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ उडाली आहे.
जळगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल
शस्त्रा बाळगून दहशत माजविण्याच्या या प्रकारानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी भोमपालीला पिस्तुलासह जळगाव शहर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र कायद्यांतर्गत (आर्म्स अॅक्ट) गुन्हा दाखल करण्यात आला असून, हे पिस्तूल त्याने कुठून आणले आणि याचा वापर तो कुठे करणार होता, याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
‘या’ बहाद्दर पोलीस पथकाची धडक कामगिरी
ही धडाकेबाज कारवाई जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, अक्रम शेख, विजय पाटील, किशोर पाटील, मुरलीधर धनगर, प्रवीण भालेराव, पोलीस कॉन्स्टेबल छगन तायडे, रविंद्र कापडे, राहुल रगडे आणि प्रदीप सपकाळे आदींच्या पथकाने अत्यंत चोखपणे यशस्वीरीत्या पार पाडली.









