
सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे निवेदन!
यावल (प्रतिनिधी) – यावल शहरातील अंत्ययात्रेदरम्यान जातिवाचक शिवीगाळ, अपमानास्पद वर्तन तसेच अंत्ययात्रेची वाजंत्री बंद पाडल्याच्या कथित प्रकाराला आता गंभीर वळण मिळाले आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाल्यानंतर तक्रारदार शितलकुमार युवराज घारू यांनी पोलिसांकडे सविस्तर निवेदन सादर केले आहे. या निवेदनाद्वारे घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.


निवेदनानुसार, १८ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता यावल शहरातील नानीना परिसरात स्वर्गीय कमलाबाई सुधाकर घारू यांच्या अंत्ययात्रेदरम्यान अडथळा निर्माण करण्यात आल्याचा आरोप आहे. यावेळी अंत्ययात्रेत सहभागी असलेल्या व्यक्तींना जातिवाचक व अपमानास्पद शब्द वापरून दमदाटी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. सार्वजनिक रस्त्यावर अडथळा निर्माण करणे, बेकायदेशीररीत्या मार्ग रोखणे आणि धमकी देणे यासंदर्भातील बाबींचाही निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे.
घटनेच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या मशिदीच्या ट्रस्टी, सभासद तसेच इतर प्रत्यक्षदर्शींची ओळख पटवून त्यांची भूमिका तपासण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. परिसरातील मशीद, दुकाने, नगरपालिका तसेच इतर सार्वजनिक ठिकाणांवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तातडीने ताब्यात घेऊन सुरक्षित ठेवावे, असेही निवेदनात म्हटले आहे.
अंत्ययात्रेत सहभागी असलेले प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, नातेवाईक आणि समाजबांधव यांचे जबाब नोंदविण्यात यावेत. तसेच संबंधित ट्रस्टी मंडळ आणि इतर व्यक्तींची भूमिका तपासून प्रत्यक्ष गुन्ह्यात सहभाग आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तपासाची मागणी संपूर्ण प्रकरणाची चौकशी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पारदर्शकपणे करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. यासोबतच निवेदनाची अधिकृत पोच देऊन एफआयआर क्रमांक आणि तपासादरम्यान करण्यात आलेल्या कारवाईची माहिती अर्जदाराला देण्यात यावी, असेही नमूद करण्यात आले आहे.
भविष्यात अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, सामाजिक मिरवणुका आणि सार्वजनिक कार्यक्रमांदरम्यान अशा प्रकारचे अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणीदेखील करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास डीवायएसपी अनिल बडगुजर करीत आहेत. सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि अन्य पुराव्यांच्या आधारे पोलीस तपासात काय निष्पन्न होते, याकडे यावल शहरासह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.








