
एरंडोल तालुक्यातील आडगाव परिसरात हळहळ
एरंडोल ( प्रतिनिधी ) :- शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टर घेऊन जात असताना चालकाचा ताबा सुटून ट्रॅक्टर थेट जामदा डाव्या कालव्यात कोसळल्याने १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवार, दि. २० नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास एरंडोल तालुक्यातील आडगाव परिसरात घडली. विजय भाऊसाहेब पाटील (वय १९, रा. आडगाव, ता. एरंडोल) असे मयत तरुणाचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेमुळे पाटील कुटुंबावर शोककळा पसरली असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.


प्राप्त माहितीनुसार, आडगाव येथील भाऊसाहेब बापुराव पाटील यांच्या मालकीचा स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर त्यांचा थोरला मुलगा विजय चालवत होता. गुरुवारी सकाळी भूषण चौधरी यांच्या शेतात रोटाव्हेटरच्या माध्यमातून मशागतीचे काम करण्यासाठी तो ट्रॅक्टर घेऊन निघाला होता. पारोळा फाट्याजवळील जामदा डाव्या कालव्याच्या पाटचारीवरून मार्गक्रमण करत असताना अचानक ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर थेट कालव्यात जाऊन कोसळला. या अपघातात विजय ट्रॅक्टरखाली दबल्याने तो गंभीररीत्या जखमी झाला.
घटनेची माहिती मिळताच ईश्वर दयाराम पाटील यांनी विजयचे काका धनराज दिगंबर पाटील यांना फोनद्वारे कळवले. माहिती मिळताच धनराज पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस पाटील आणि ग्रामस्थांच्या मदतीने ट्रॅक्टरखाली दबलेल्या विजयला बाहेर काढण्यात आले. घटनेची माहिती समजताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
जखमी विजयला तातडीने खासगी वाहनाने उपचारासाठी एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले; परंतु तेथील डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी मयत विजयचे काका धनराज दिगंबर पाटील यांनी कासोदा पोलीस ठाण्यात माहिती दिली असून, पोलिसांनी घटनेची नोंद घेत शवविच्छेदन व पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.
विजय हा भाऊसाहेब पाटील यांचा मोठा मुलगा होता. त्याच्या पश्चात आई, वडील आणि लहान भाऊ असा परिवार आहे. घराचा आधारवड असलेल्या तरुण मुलाच्या अकाली जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून आडगाव परिसरातून सर्वत्र शोक व्यक्त होत आहे.









