
नगरसेवक पराग सराफ यांच्या पाठपुराव्याला यश; आमदार अमोल जावळे यांच्या सहकार्याने विकासकामाला प्रशासकीय मान्यता
यावल ( प्रतिनिधी ) : यावल शहरातील वाणी गल्ली परिसरातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जिल्हा वार्षिक योजना (नागरी दलितेतर वस्ती सुधार योजना) सन २०२६-२७ अंतर्गत वाणी गल्लीतील नवीन गटार बांधकामासाठी १९ लाख ९० हजार ९५० रुपयांच्या कामाला जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथील नगरविकास शाखेकडून प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. नगरसेवक पराग विजय सराफ यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, आमदार अमोल जावळे यांच्या सहकार्याने या विकासकामाचा मार्ग मोकळा झाला आहे.
यावल नगरपरिषद हद्दीतील वाणी गल्ली परिसरात सांडपाण्याच्या निचऱ्याचा प्रश्न लक्षात घेता नवीन गटार बांधकामाची आवश्यकता होती. या पार्श्वभूमीवर नगरसेवक पराग विजय सराफ यांनी संबंधित यंत्रणेकडे प्रस्ताव सादर करून निधी मंजुरीसाठी पाठपुरावा केला. नागरिकांची समस्या मार्गी लागावी, यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.
या पाठपुराव्याला आमदार अमोल जावळे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सहकार्य केले. त्यानंतर जिल्हा वार्षिक योजना २०२६-२७ अंतर्गत या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
सुनील श्रावगी यांच्या घरापासून बाविसे सर यांच्या घरापर्यंत नवीन गटार बांधण्यात येणार असून, या कामासाठी १९ लाख ९० हजार ९५० रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या कामामुळे परिसरातील सांडपाण्याच्या निचऱ्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
या कामाला मंजुरी मिळाल्यानंतर नगरसेवक पराग विजय सराफ यांनी जिल्हाधिकारी साहेबांचे विशेष आभार मानले. तसेच यावल तालुक्याचे आमदार अमोलदादा जावळे यांनी आपल्या मागणीला सहकार्य करून नागरिकांच्या प्रश्नाला प्राधान्य दिल्याबद्दल त्यांचेही मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
वाणी गल्लीतील या महत्त्वपूर्ण विकासकामाला प्रशासकीय मान्यता मिळाल्याने परिसरात समाधान व्यक्त होत असून, आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात कधी होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.










