चाळीसगाव (प्रतिनिधी):- चाळीसगाव शहरातील खडकी बायपास परिसरात अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत तब्बल ७० हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रोहिदास शांताराम मराठे (वय ३६) हे खडकी बायपास येथील संकटमोचन हनुमान मंदिरासमोरील हिरापूर रस्त्यावर वास्तव्यास आहेत. ते केळी वेफर्सचा व्यवसाय करतात. १ जुलै रोजी दुपारी २.३० ते सायंकाळी ४ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील ५०० रुपयांच्या १४० चलनी नोटा, असा एकूण ७० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३१९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०५ व ३३१(३) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार योगेश मांडोळे करीत आहे.








