अमळनेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील टाकरखेडा येथील ज्येष्ठ कारागीर देविदास लटकन सुतार (वय ७४) यांचा लाकडाचे काम करताना झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (२ जुलै) दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे टाकरखेडा परिसरात शोककळा पसरली आहे.


देविदास सुतार हे नेहमीप्रमाणे आपल्या घरी लाकडाचे काम करत होते. यावेळी त्यांच्या हातातील ग्राइंडर मशीनवरील अचानक नियंत्रण सुटले. मशीनचा धारदार भाग थेट त्यांच्या गळ्याला लागल्याने ते गंभीर जखमी झाले. या अपघातात त्यांच्या गळ्यात खोल जखम होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला.
घटनास्थळी उपस्थितांनी तत्काळ त्यांना उपचारासाठी हलविण्याचा प्रयत्न केला. मात्र, गंभीर दुखापतीमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
मृतदेह शवविच्छेदनासाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला असून या दुर्दैवी घटनेमुळे टाकरखेडा गावावर शोककळा पसरली आहे. देविदास सुतार यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक आणि मोठा मित्रपरिवार आहे.









