दोन महिन्यांपासून न्यायासाठी वडिलांची धावपळ; पोलीस अधीक्षकांकडे तक्रार
जळगाव/धरणगाव (प्रतिनिधी):- धरणगाव तालुक्यातील रेल येथे क्रिकेट खेळताना मृत्यू झालेल्या १२ वर्षीय गणेश नवल पाटील याच्या छातीत बॅट मारण्यात आल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे. संबंधितांवर कारवाई व्हावी यासाठी पाळधी पोलीस दूरक्षेत्र व धरणगाव पोलीस ठाण्यात वारंवार पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याने अखेर त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे.

दि. १३ मार्च रोजी रेल गावात क्रिकेट खेळताना गणेश पाटील हा मैदानावर अचानक कोसळला होता. त्याला तातडीने जळगावातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. सुरुवातीला कोणताही संशय नसल्याने शवविच्छेदन न करता कुटुंबीयांनी मृतदेह गावी नेऊन अंत्यसंस्कार केले होते.
मात्र नंतर गावातील काही मुलांकडून माहिती घेतली असता, क्रिकेट खेळताना एका मुलाने गणेशच्या छातीत बॅट मारली होती आणि त्यानंतर तो मुलगा घटनास्थळावरून घरी निघून गेला होता, अशी माहिती समोर आल्याचा दावा गणेशचे वडील नवल पाटील यांनी केला आहे.
या प्रकरणी त्यांनी पाळधी पोलीस दूरक्षेत्रात तक्रार देत संबंधितांवर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर धरणगाव पोलीस ठाण्यातही त्यांनी धाव घेतली. मात्र दोन महिन्यांपासून सतत चकरा मारूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान, पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार देण्यासाठी आलेल्या नवल पाटील यांनी आपल्या एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूची घटना सांगताना अश्रूंना वाट मोकळी करून दिली. “मुलगा गेला, आता तरी न्याय द्या,” अशी हळवी विनंती त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.









