पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह; कर्मचारी संघटनांची पालकमंत्र्यांकडे धाव
जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वर्ग-३ कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेत प्रशासनाने संघटना पदाधिकाऱ्यांना सभागृहात प्रवेश नाकारल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, ही प्रक्रिया पारदर्शक होणार की नाही, याबाबत संभ्रम व्यक्त केला जात आहे.


काय आहे मुख्य वाद?
आरोग्य विभागाच्या वर्ग-३ कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या दि. ११ मे २०२६ रोजी होणार आहेत. नियमानुसार, या बदल्या ‘ओपन स्क्रीन’ पद्धतीने आणि सर्वांसमक्ष होणे बंधनकारक आहे. आजवर कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून संघटनांचे अध्यक्ष व सचिवांना निरीक्षक म्हणून उपस्थित राहण्याची परवानगी दिली जात होती. मात्र, यंदा प्रशासनाने त्यांना मज्जाव केल्याने संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
पालकमंत्र्यांकडे साकडे
या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी आरोग्य कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीने राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची पाळधी येथील निवासस्थानी भेट घेतली. प्रशासनाने शासन निर्णयाचे उल्लंघन केल्याचे सांगत, बदली प्रक्रियेत संघटना प्रतिनिधींना उपस्थित राहण्याची परवानगी देण्याबाबत प्रशासनाला निर्देश द्यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
प्रशासनाला इशारा
“संघटना प्रतिनिधींना प्रक्रियेपासून दूर ठेवणे हे पारदर्शक प्रशासनाच्या भूमिकेला बाधक आहे,” असे मत समन्वय समितीने व्यक्त केले आहे. जर प्रशासनाने आपला निर्णय बदलला नाही, तर सर्व कर्मचारी संघटना एकत्रितपणे लढा देतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.








