जळगाव ( प्रतिनिधी ) –शहरातील सिव्हिल हॉस्पिटल परिसरात सार्वजनिक ठिकाणी धारदार चॉपर बाळगून फिरणाऱ्या शुभम साहेबराव साठे (वय २०) याच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून लोखंडी धारदार चॉपर जप्त केला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील न्यू भारत डेअरीलगतच्या गल्लीत शुभम साठे हा संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. तपासणीदरम्यान त्याच्याकडे कोणताही परवाना नसताना सुमारे ९ इंच लांबीचा धारदार लोखंडी चॉपर आढळून आला.
सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने तसेच गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत तो फिरत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी आर्म ॲक्ट आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.









