वडिलांना शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने तरुणाला धक्का मारून पाडले; उजवा हात फ्रॅक्चर


भुसावळ तालुका पोलिसांत गुन्हा
भुसावळ (विशेष प्रतिनिधी): वडिलांना विनाकारण शिवीगाळ केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणाला जोरात धक्का मारून जमिनीवर पाडल्याने त्याचा हात फ्रॅक्चर झाल्याची घटना समोर आली आहे. भुसावळ तालुक्यातील सुनसगाव येथे ६ जुलै २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजेच्या सुमारास तक्रारदाराच्या घरासमोर हा प्रकार घडला होता. उपचार घेतल्यानंतर पीडिताने पोलिसांत तक्रार नोंदवली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंकज सुधारक शिरसाळे (वय ३६, व्यवसाय- खाजगी नोकरी, रा. आदर्श नगर जळगाव, मूळ रा. सुनसगाव, ता. भुसावळ) यांच्या वडिलांना संशयित गोविंद अनिल शिरसाळे (रा. टेलिफोन नगर जळगाव, मूळ रा. सुनसगाव) याने विनाकारण शिवीगाळ केली होती. पंकज शिरसाळे हे संशयितास “माझ्या वडिलांना शिवीगाळ का केली?” असा जाब विचारण्यास गेले असता, आरोपीने त्यांनाही शिवीगाळ करत चापटबुक्क्यांनी मारहाण केली.
तसेच आरोपीने पंकज यांना जोरात धक्का दिल्याने ते जमिनीवर कोसळले. या अपघातात त्यांच्या उजव्या हाताला गंभीर फ्रॅक्चर झाले व डाव्या पायाला दुखापत झाली. घटनेनंतर पंकज यांच्यावर जळगाव येथील गणेश हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचार पूर्ण झाल्यानंतर त्यांनी ९ ऑगस्ट २०२६ रोजी भुसावळ तालुका पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली.
पंकज शिरसाळे यांच्या तक्रारीवरून ९ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १:५४ वाजेच्या सुमारास आरोपी गोविंदा अनिल शिरसाळे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२), ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे (गुन्हा रजि. नं. १४४/२०२६).
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांनी भेट दिली असून, पोलीस उपनिरीक्षक संजय कंखरे या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.








