चोपडा शहरात ९ गोवंश जनावरांची निर्दयतेने वाहतूक करणारी पिकअप अपघातग्रस्त


१० लाखांच्या वाहनासह ४.३० लाखांचे गोवंश जप्त, चालकाविरोधात गुन्हा
चोपडा (विशेष प्रतिनिधी): गोवंश जातीच्या ९ जनावरांना अत्यंत क्रूरतेने, कत्तलीच्या उद्देशाने वाहनात कोंबून नेणारी एक विनाक्रमांकाची महिंद्रा पिकअप अपघातात चक्काचूर झाली. अपघातानंतर संशयित चालक वाहन व जनावरे घटनास्थळीच सोडून पसार झाला. चोपडा शहरातील जुन्या शिरपूर रोडवरील हरेश्वर मंदिरासमोरील पुलाजवळ ९ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे ५:३० वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.
मिळालेल्या माहितीनुसार, पांढऱ्या रंगाची विनाक्रमांकाची महिंद्रा पिकअप गाडी जुन्या शिरपूर रोडवरून जात असताना तिचे मागील दोन्ही टायर फुटले. तसेच पुढील काच, बोनेटचा पत्रा, केबिन व इंजिनचे मोठे नुकसान होऊन ड्रायव्हर साईडचा दरवाजा तुटलेला होता. या वाहनाची पाहणी केली असता, त्यात ४ लाख ३० हजार रुपये किमतीची ९ गोवंश जातीची जनावरे कमी उंचीच्या वाहनात अत्यंत क्रूरतेने, दुखापत होईल अशा स्थितीत बांधून कत्तल करण्याच्या इराद्याने ठेवलेली आढळून आली.
अपघातानंतर अज्ञात चालकाने १० लाख रुपये किमतीची पिकअप आणि ४.३० लाखांची जनावरे असा एकूण १४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल रस्त्यावरच सोडून पळ काढला.
या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार महेंद्र युवराज पाटील (वय ३५, रा. चोपडा) यांच्या फिर्यादीवरून ९ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १:३० वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनचालकाविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करणाऱ्या कायद्यासह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम आणि सुधारित कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे (गुन्हा रजि. नं. ३३१/२०२६). पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष पारधी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.









