जळगाव जिल्हा न्यायालयाचा निकाल
जळगाव ( प्रतिनिधी ) – रामेश्वर कॉलनीतील तुळजामाता नगरात भाजीपाला विक्री करणाऱ्या महिलेशी ओळख निर्माण करत अनैतिक संबंधातून झालेल्या वादातून महिलेचा खून केल्याप्रकरणी सुरेश सुकलाल महाजन (५५, रा. रामेश्वर कॉलनी) याला जळगाव जिल्हा न्यायालयाचे न्यायमुर्ती एस.एस. सापटणेकर यांनी जन्मठेपेची शिक्षा बुधवारी १२ जुलै रोजी दुपारी ३ वाजता सुनावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुरेश सुकलाल महाजन हा भाजीपाल्याचा व्यवसाय करायचा. हाच व्यवसाय करणाऱ्या वंदना गोरख पाटील या महिलेचादेखील होता. यातून दोघांमध्ये ओळख होऊन घरोब्याचे संबंध निर्माण झाले आणि त्याचे रुपांतर अनैतिक संबंधात झाले. त्यामुळे आरोपीचे महिला राहत असलेल्या तुळजामाता नगरातील घरी येणे – जाणे वाढले. २६ ऑगस्ट २०२१च्या रात्री याच परिसरात राहणारे रामलाल पवार यांच्याकडे दोघांनी ठेवलेले पैसे घेण्यासाठी महिला व सुरेश महाजन हे गेले. दोघेही जण पैसे घेऊन निघून गेले. त्याच रात्री महिलेच्या घरी दोघांमध्ये वाद झाला. या रागातून महाजन याने अर्धा किलो वजनाच्या मापाने, चाकू तसेच ओढणीच्या सहायाने गळफास देत महिलेचा खून केला होता. त्यानुसार पोलीसांनी अटक करण्यात आली होती. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी न्यायालयात कामकाज झाले. यात मयताचा मुलगा दीपक, साक्षीदार रामलाल पवार, वैद्यकीय अधिकारी तसेच शेजारी राहणारे साक्षीदार यांच्या साक्ष महत्त्वाच्या ठरल्या. त्यानुसार न्यायालयाने महाजन याला दोषी ठरविले. त्यानुसार महिलेच्या खूनाच्या गुन्ह्यातील आरोपी सुरेश महाजन याला जन्मठेप आणि ५ हजार रूपयांचा दंडाची शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे ॲड. पंढरीनाथ चौधरी यांनी प्रभावी बाजू मांडली. त्यांना पैरवी अधिकारी ताराचंद जावळे यांनी सहकार्य केले.