जळगाव ( प्रतिनिधी ) – गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्या वैद्यकीय सेवेला १३ जुलै रोजी ३६ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व धर्मार्थ रूग्णालयात एचआयव्ही बाधितांसाठी एआरटी सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी सांगितले की, येथे येणार्या एचआयव्ही बाधितांना मोफत औषधींसह अन्य आजारांची तज्ञांद्वारे तपासणीही केली जाईल. तसेच भोजनही दिले जाणार आहे असेही डॉ.पाटील यांनी सांगितले.
याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खा. डॉ.उल्हास पाटील, अधिष्टाता डॉ. एन एस आर्विकर, वैद्यकिय अधिक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत, अलायंस इंडियाच्या महाराष्ट्र राज्य समन्वयक मनिषा साळुंखे, जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण विभागातील जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय पहूरकर, रुग्णालयातील डॉ.बडगुजर यांच्या प्रमुख उपस्थीतीत एआरटी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. मान्यवरांच्याहस्ते फित कापून व दिपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी वैद्यकीय अधिक्षक डॉ.प्रेमचंद पंडित यांनी सांगितले की, १३ जुलै १९८७ रोजी डॉ.उल्हास पाटील यांनी जळगाव येथील सिव्हील हॉस्पिटल येथून वैद्यकीय प्रवासास सुरुवात केली. त्यांच्या वैद्यकीय सेवेतून हजारो मातांना सुखद मातृत्व प्राप्त झाले. या प्रदिर्घ सेवेचे निमित्त साधत डॉ.उल्हास पाटील धर्मार्थ रुग्णालयात जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण विभाग, जळगाव यांच्या सहकार्याने एआरटी सेंटरचे उद्घाटन आज करण्यात आले. केंद्राच्या माध्यमातून एचआयव्ही बाधित व्यक्तींना राष्ट्रीय एडस नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत तज्ञ डॉक्टरांचा सल्ला व मार्गदर्शन, काही तपासण्या, मोफत औषधींसह भोजनही दिले जाणार आहे. जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या एआरटी केंद्रामुळे एचआयव्ही बाधितांना येथे येणे सोयीचे होणार आहे.
केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय पहूरकर यांनी सांगितले की, जळगाव जिल्ह्यात ६ हजार एचआयव्ही बाधित व्यक्ती असून दर महिन्याला २० ते २५ नविन रुग्णांची नोंद होत आहे. जिल्हा रुग्णालय व अमळनेर सोबतच आता गोदावरी फाऊंडेनशन संचलित डॉ.उल्हास पाटील धर्मार्थ रुग्णालयातील एआरटी सेंटर कार्यान्वित करण्यात आले असून भुसावळ, मुक्ताईनगर, रावेर, मलकापूर या पट्ट्यातील बाधितांना सोयीचे होणार आहे. येथे येणार्या रुग्णांना भोजनही दिले जाणार असे डॉ.उल्हास पाटील यांनी जाहिर करताच त्याबाबत पहूरकर यांनी आभार मानले. याप्रसंगी रुग्णालयातील प्रशासकीय अधिकारी अशोक भिडे, अशोक बर्हाटे, इएसआयसीचे हेमंत पाटील आदिंची उपस्थीती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नर्सिंग विभागातील प्रतिमा शिवणकर, वैशाली वाघ, चिन्मय शुक्ला, दिव्याना पवार, एंजेला एलिस, आकाश धनगर, प्रतिक अडे, माधुरी आदिंचे अनमोल सहकार्य लाभले.