शनिपेठ पोलिसांत तिघांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील गुरुनानक नगर भागातील मायक्का देवी मंदिरासमोरील गल्लीत जुन्या वादाची कुरापत काढून एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना १२ सप्टेंबर रोजी दुपारी घडली. या हल्ल्यात क्षितीज उर्फ सिद्धू मनोज निधाने (रा. गुरुनानक नगर, जळगाव) हा तरुण गंभीर जखमी झाला असून, याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी लकी भरत कुरील (वय २०, रा. गुरुनानक नगर, जळगाव) आणि त्याचा मित्र क्षितीज उर्फ सिद्धू मनोज निधाने हे १२ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे ४:१० वाजेच्या सुमारास मायक्का देवी मंदिरासमोरील गल्लीत उपस्थित होते. त्यावेळी जुन्या वादाच्या कारणावरून राहुल शिंदे, विजय शिंदे आणि लखन (तिघेही रा. चौघुले प्लॉट, कांचन नगर, जळगाव) यांनी तिथे येऊन क्षितीज यास शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर संशयित आरोपी राहुल शिंदे याने त्याच्याजवळील धारदार शस्त्राने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने क्षितीज उर्फ सिद्धू याच्यावर वार करून त्यास गंभीर जखमी केले. यावेळी सोबत असलेल्या इतर साथीदारांनी “त्याला मारून टाका” अशी आरडाओरड करत दहशत निर्माण केली.
घटनेनंतर जखमी क्षितीज यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी लकी कुरील याच्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलीस ठाण्यात आरोपी राहुल शिंदे, विजय शिंदे व लखन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे व शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाचा पुढील तपास परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक संतोष खेडकर करत असून, अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नसून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.








