जळगाव (प्रतिनिधी):- अंमली पदार्थांविरोधात जळगाव जिल्हा पोलिसांनी पुकारलेल्या लढ्याला मोठे यश मिळाले आहे. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये जप्त करण्यात आलेला तब्बल २ कोटी ७२ लाख ४० हजार रुपये किमतीचा १३६२ किलो गांजा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सोमवारी (दि. ११) नष्ट करण्यात आला.


जिल्ह्यातील वेगवेगळ्या २३ गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी हा गांजा जप्त केला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तथा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे नोडल अधिकारी राहुल गायकवाड यांनी या मुद्देमालाचा आढावा घेऊन तो नष्ट करण्याचा प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीकडे सादर केला होता. समितीच्या मंजुरीनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार ही विल्हेवाट लावण्यात आली.
सोमवारी सकाळी आणि दुपारी अशा दोन सत्रांत जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या मागील मोकळ्या जागेत ही प्रक्रिया राबवण्यात आली. पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने खड्डा खोदून गांजाचा नाश करण्यात आला. पारदर्शकता राखण्यासाठी या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या देखरेखीखाली ही कारवाई झाली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, पोलीस उपअधीक्षक (गृह) प्रदीप ठाकूर, कृषी विभागाचे विकास बोरसे आणि निरीक्षक राजेंद्र व्यवहारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक फौजदार संजय दोरकर, पोहेकॉ संदीप पाटील, जयंत चौधरी, अजय पाटील आणि रवींद्र चौधरी यांच्या पथकाने ही कार्यवाही यशस्वी केली








