मंगळसूत्र दुरुस्तीबाबत विचारल्याने पतीने दारूच्या नशेत पत्नीचा आवळला गळा


लाकडी दांड्याने मारहाण, जळगाव जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल
जळगाव (विशेष प्रतिनिधी): “गळ्यातील मंगळसूत्र दुरुस्त करून आणले का?” असे विचारल्याच्या कारणावरून पतीने दारूच्या नशेत पत्नीचे केस धरून चापटबुक्क्यांनी मारहाण करत तिचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. तसेच तावडीतून सुटून पळत असताना पाठीमागून लाकडी दांडा मारून जखमी केल्याची गंभीर घटना जळगाव शहरात घडली आहे. शहरातील गणेश नगर परिसरातील मधुबन अपार्टमेंटमध्ये ३० जुलै २०२६ रोजी सकाळी ५:०० वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी १० ऑगस्ट रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार सौ. निकिता सौरभ जैस्वाल (वय ३१, व्यवसाय- गृहिणी, रा. ०५/०६ मधुबन अपार्टमेंट, गणेश कॉलनी, जळगाव) यांनी २८ जुलै २०२६ रोजी आपले गळ्यातील मंगळसूत्र दुरुस्तीसाठी पती सौरभ विकास जैस्वाल यांच्याकडे दिले होते.
३० जुलै रोजी सकाळी ५:०० वाजेच्या सुमारास निकिता यांनी पती सौरभ यांना मंगलसूत्र दुरुस्त करून आणले का, अशी विचारपूस केली. या साध्या प्रश्नाचा राग धरून दारूच्या नशेत असलेल्या पतीने निकिता यांना अश्लील शिवीगाळ करत त्यांचे केस पकडून चापटबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता पतीने थेट पत्नीचा गळा दाबून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. निकिता यांनी स्वतःची सुटका करून घेत पळ काढण्याचा प्रयत्न केला असता, पतीने लाकडी दांड्याने मारहाण करून त्यांना जखमी केले.
पतीविरुद्ध गुन्हा दाखल
या कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनेनंतर पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून १० ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात पती सौरभ विकास जैस्वाल याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ३५१(२) आणि ३५२ अन्वये (गुन्हा रजि. क्र. २४४/२०२६) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक कमलेश पवार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.








