दोघा भावांवर लोखंडी रॉड व काठीने प्राणघातक हल्ला, ८ जणांवर गुन्हा दाखल
चाळीसगाव (विशेष प्रतिनिधी): “तू माझ्याकडे का बघतोस?” या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर भीषण दंगलीत होऊन एकाच कुटुंबातील आठ जणांनी दोन भावांवर लोखंडी रॉड आणि लाकडी काठीने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे येथील सेवालाल महाराज मंदिरासमोर सार्वजनिक जागेत ८ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ८:०० वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी १० ऑगस्ट रोजी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांत आठ जणांविरुद्ध दंगल आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


नेमका काय घडला प्रकार?
तक्रारदार ज्ञानेश्वर पितांबर राठोड (वय २८, रा. तरवाडे, ता. चाळीसगाव) आणि त्यांचा भाऊ मंगेश हे सेवालाल महाराज मंदिरासमोर असताना संशयित आरोपी युवराज गोकुळ चव्हाण याने त्यांना “तुम्ही माझ्याकडे का बघतात?” असे विचारत अचानक अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ज्ञानेश्वर व त्यांच्या भावाने “आम्हाला शिवीगाळ करू नको,” असे म्हटल्याचा राग आल्याने आरोपींनी जमाव जमवून हिंसक हल्ला चढवला.
रॉड अन् काठ्यांनी बेदम मारहाण
संशयित आरोपी विजय गोकुळ चव्हाण याने हातातील लोखंडी रॉडने ज्ञानेश्वर यांच्या डोक्यात मारून त्यांना गंभीर दुखापात केली. तर नीलेश गोकुळ चव्हाण व योगेश गोकुळ चव्हाण यांनी ज्ञानेश्वर व त्यांचे भाऊ मंगेश यांना लाकडी काठीने पायावर, मांडीवर, पाठीवर आणि डोक्यावर मारहाण करून दुखापत केली.
तसेच इतर आरोपी युवराज चव्हाण, गोकुळ चव्हाण, प्रेम चव्हाण, नितीन चव्हाण आणि रेखाबाई चव्हाण यांनी दोघा भावांना चापटबुक्क्यांनी बेदम मारहाण करत अश्लील शिवीगाळ केली. “तुम्ही पुन्हा आमच्या नादाला लागले तर तुम्हाला सोडणार नाही,” अशी जीवे मारण्याची धमकीही या वेळी गोकुळ चव्हाण याने दिली.
आठ जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल
या हिंसक घटनेनंतर पीडित ज्ञानेश्वर राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आठही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५२, १८९(२), १८९(४), १९०, १९१(१) आणि १९१(२) अन्वये दंगल (Riot) व गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे (गुन्हा रजि. क्र. २३५/२०२६).
चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोपाल पाटील या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.









