जळगावच्या सर्वांगीण विकासासाठी नगरसेवकांनी समर्पित भावनेने कार्य करावे : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन


नाशिकमध्ये दोनदिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
नाशिक :अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, नाशिक केंद्राच्या वतीने जळगाव महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी दोन दिवसीय विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण वर्गादरम्यान शुक्रवारी (७ ऑगस्ट) राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे नेते नामदार गिरीश महाजन यांनी उपस्थित राहून नवनिर्वाचित नगरसेवकांशी सविस्तर संवाद साधला.
पारदर्शकता आणि उत्तरदायित्व महत्त्वाचे
उपस्थित लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करताना ना. गिरीश महाजन म्हणाले, “लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करणे हे आपले प्राथमिक कर्तव्य आहे. यासाठी कामात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि विकासाभिमुख दृष्टीकोन ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी, नागरिकांचा सहभाग आणि नियोजनबद्ध कामे यांच्या माध्यमातून जळगाव शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रत्येक नगरसेवकाने समर्पित भावनेने कार्य करावे.” तसेच, सक्षम लोकप्रतिनिधी आणि प्रभावी स्थानिक स्वराज्य व्यवस्था हीच एका विकसित शहराची खरी ताकद असल्याचे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले.
विकासमार्गासाठी प्रशिक्षण वर्ग मोलाचा: महापौर दीपमाला काळे
या कार्यक्रमादरम्यान जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांनी महानगरपालिकेच्या कामकाजाची आणि सर्व नगरसेवकांची सविस्तर माहिती दिली. आगामी काळात जळगाव शहराला प्रगती आणि विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी सर्व नगरसेवकांचे सहकार्य अत्यंत आवश्यक आहे, असे सांगतानाच हे प्रशिक्षण शिबीर नगरसेवकांसाठी अत्यंत मार्गदर्शक आणि महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सभाशास्त्र व मनपा कार्यपद्धतीवर मार्गदर्शन
या प्रशिक्षण वर्गामध्ये अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रशिक्षक तथा निवृत्त मनपा आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी नगरसेवकांना मनपाची कार्यपद्धती, कायदे आणि सभाशास्त्र याविषयी सखोल मार्गदर्शन केले.
सूत्रसंचालन नगरसेविका ॲड. शुचिता हाडा यांनी केले. या प्रसंगी उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, भाजपचे गटनेते प्रकाश बालाणी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व गटनेते विष्णू भंगाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते प्रफुल्ल देवकर, शिवसेना ठाकरे गटाचे गटनेते अर्शीनबानो खाटीक, भाजपचे पश्चिम जिल्हाध्यक्ष व नगरसेवक डॉ. राधेश्याम चौधरी यांच्यासह जळगाव मनपाचे सर्व नगरसेवक आणि विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









