नागपूरच्या ‘मॅस्टाकॉन-२०२६’ मध्ये आयएमए जळगावचा राज्यस्तरावर डंका; शाखेलाही ‘बेस्ट इको फ्रेंडली ब्रँच’ पुरस्कार
जळगाव / नागपूर (प्रतिनिधी) :- इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) महाराष्ट्र राज्य शाखेतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘प्रेसिडेंट्स ॲप्रिसिएशन अवॉर्ड फॉर बेस्ट सेक्रेटरी – बिग ब्रँच (२०२५-२६)’ हा राज्यस्तरीय पुरस्कार आयएमए जळगाव शाखेचे मानद सचिव डॉ. भरत बोरोले यांना प्रदान करण्यात आला. शनिवार, दि. १४ नोव्हेंबर २०२६ रोजी नागपूर येथील आयएमए हाऊस येथे आयोजित ६६ व्या वार्षिक राज्य परिषद ‘मॅस्टाकॉन-२०२६’ व ‘आयएमएकॉन-२०२६’ या भव्य सोहळ्यात त्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या सन्मानामुळे आयएमए जळगावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

या राज्यस्तरीय परिषदेच्या उद्घाटन व पदग्रहण समारंभास राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री मा. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे, कामगार मंत्री ॲड. आकाशजी फुंडकर, आमदार तुषार राठोड, आयएमएचे राष्ट्रीय नियोजित अध्यक्ष डॉ. जयेश लेले तसेच माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक आढाव यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुरस्कार वितरण सोहळ्यात आयएमए महाराष्ट्र राज्याचे मावळते अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी, आयएमएचे राष्ट्रीय नियोजित अध्यक्ष डॉ. जयेश लेले, नवनिर्वाचित राज्याध्यक्षा डॉ. मंजुषा गिरी आणि राज्य सचिव डॉ. रश्मी मेहता यांच्या हस्ते डॉ. भरत बोरोले यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे (MMC) नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. संजय कदम, एक्झिक्युटिव्ह मेंबर डॉ. अनिल पाटील, राज्य उपाध्यक्ष डॉ. स्नेहल फेगडे, राज्याचे मावळते सचिव डॉ. विक्रांत देसाई तसेच कोषाध्यक्ष डॉ. अमोल गिट्टे यांची विशेष उपस्थिती होती.
वैद्यकीय क्षेत्रातील संघटनात्मक कार्य, सामाजिक बांधिलकी, डॉक्टरांना एकत्रित आणण्यासाठी केलेले प्रयत्न आणि आयएमएच्या विविध उपक्रमांमधील सक्रिय योगदान या उल्लेखनीय कार्याची दखल घेत डॉ. बोरोले यांची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
आयएमए जळगावच्या यशात मानाचे अनेक पुरस्कार
यंदाच्या राज्यस्तरीय परिषदेत आयएमए जळगाव शाखेने घवघवीत यश संपादन केले. डॉ. भरत बोरोले यांच्या ‘बेस्ट सेक्रेटरी’ पुरस्कारासोबतच जळगाव शाखेतील डॉ. अनिता भोळे, डॉ. लीना पाटील, डॉ. अजिंक्य पाटील आणि डॉ. निरंजन चव्हाण यांनाही त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याशिवाय, पर्यावरणपूरक उपक्रम आणि सामाजिक जाणीव जपणाऱ्या कार्याची दखल घेत आयएमए जळगाव शाखेला ‘बेस्ट इको फ्रेंडली ब्रँच अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला. त्यामुळे यंदाची राज्य परिषद आयएमए जळगावसाठी विशेष अभिमानाची आणि यशाची ठरली.
सत्काराला उत्तर देताना डॉ. भरत बोरोले यांनी हा पुरस्कार केवळ वैयक्तिक सन्मान नसून संपूर्ण आयएमए जळगाव परिवाराच्या एकजुटीचा, सहकार्याचा आणि सामूहिक प्रयत्नांचा गौरव असल्याची भावना व्यक्त केली. हा पुरस्कार आयएमए जळगावचे अध्यक्ष डॉ. शशिकांत गाजरे, डॉ. विलास भोळे, डॉ. अनिता भोळे, डॉ. स्नेहल फेगडे तसेच सर्व पदाधिकारी, सदस्य आणि संपूर्ण टीम यांच्या सहकार्यामुळे शक्य झाल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
डॉ. बोरोले यांच्यासह जळगावच्या अन्य डॉक्टरांचा झालेला गौरव आणि आयएमए जळगाव शाखेला मिळालेला राज्यस्तरीय पुरस्कार यामुळे जळगावच्या वैद्यकीय क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल डॉ. उल्हास पाटील आणि डॉ. अनिल पाटील यांनी सर्व पुरस्कारप्राप्त डॉक्टरांचे विशेष अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील वैद्यकीय, सामाजिक व संघटनात्मक कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांकडूनही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
फोटो ओळ : नागपूर येथे आयोजित ‘मॅस्टाकॉन-२०२६’ सोहळ्यात राज्यस्तरीय ‘बेस्ट सेक्रेटरी’ पुरस्कार स्वीकारताना डॉ. भरत बोरोले. समवेत डॉ. जयेश लेले, डॉ. संतोष कुलकर्णी, डॉ. रश्मी मेहता, डॉ. मंजुषा गिरी आणि डॉ. स्नेहल फेगडे.








