पूजा साहित्य खरेदीसाठी भाविकांवर दबाव; गैरसोयीमुळे संताप
यावल ( प्रतिनिधी ) : यावल तालुक्यातील आडगावजवळ सातपुड्याच्या निसर्गरम्य कुशीत वसलेल्या प्रसिद्ध श्रीक्षेत्र मनुदेवी मंदिर परिसरात पार्किंग व्यवस्थेवरून भाविकांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. देवीच्या दर्शनासाठी दूरदूरवरून येणाऱ्या भाविकांना वाहन पार्किंग करताना अडचणींचा सामना करावा लागत असून, पार्किंगच्या नावाखाली पूजा साहित्य खरेदी करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंदिराच्या खालच्या परिसरात काही व्यावसायिकांकडून भाविकांची वाहने अडवून ठराविक ठिकाणी पार्किंग करण्याचा आग्रह धरला जात असल्याच्या तक्रारी आहेत. संबंधित दुकानातून पूजा साहित्य खरेदी केल्याशिवाय वाहन पार्किंग करू दिले जात नसल्याचे काही भाविकांचे म्हणणे आहे. त्यामुळे श्रद्धेने देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
भाविक, दुकानदार आणि रिक्षाचालकांमध्ये वाद
पार्किंग आणि पूजा साहित्य खरेदीच्या मुद्द्यावरून भाविक, दुकानदार तसेच रिक्षाचालक यांच्यात वारंवार वाद निर्माण होत असल्याचे सांगण्यात येत आहे. काही वेळा वादाचे प्रसंग अधिक गंभीर होत असल्याची चर्चा परिसरात आहे. कुटुंबासह दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अशा परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याने मंदिर परिसरातील व्यवस्थेबाबत नाराजी व्यक्त होत आहे.
दुकानदार असोसिएशनकडूनही दखल घेण्याची मागणी
मनुदेवी दुकानदार असोसिएशनचे अध्यक्ष विश्वदीप पाटील यांनी या प्रकारांवर आळा घालण्याची मागणी केली आहे. वनविभागाने मंदिर परिसरातील अतिक्रमणांची पाहणी करून नियमबाह्य व्यवसाय करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, तसेच भाविकांच्या वाहनांसाठी नियोजनबद्ध पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची गरज
श्रीक्षेत्र मनुदेवी हे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असून येथे दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. त्यामुळे मंदिर परिसरात योग्य पार्किंग व्यवस्था, शिस्त आणि भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. पूजा साहित्य खरेदी करणे हा प्रत्येक भाविकाचा वैयक्तिक निर्णय असताना त्यासाठी कोणावरही दबाव आणला जाऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
या सर्व तक्रारींची वनविभाग आणि संबंधित प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन पार्किंग व्यवस्थेतील अडचणी दूर कराव्यात, तसेच भाविकांची होणारी गैरसोय थांबवावी, अशी मागणी होत आहे. आता प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे भाविकांचे लक्ष लागले आहे.









