बालहृदयरोग उपचारांसाठी जळगावात तज्ज्ञ डॉक्टरांचे विशेष पथकाची कामगीरी
जळगाव ( प्रतिनिधी ) – जन्मजात हृदयविकाराने ग्रस्त बालकांना आधुनिक वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्याच्या दिशेने महादेव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, जळगाव येथे महत्त्वपूर्ण कामगिरी करण्यात आली. १५ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित विशेष बालहृदयरोग तपासणी व उपचार शिबिरात एकूण १५ रुग्णांची तपासणी करण्यात आली, तर सात रुग्णांवर विविध अत्याधुनिक बिनटाक्याची हृदयशस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आल्या.या उपचारांमध्ये अवघ्या चार महिन्यांच्या बाळापासून ते ६२ वर्षांच्या रुग्णापर्यंत विविध वयोगटांतील रुग्णांचा समावेश होता. यामध्ये जन्मजात हृदयविकारांशी संबंधित एएसडी (हृदयाच्या वरच्या दोन कप्प्यांमधील छिद्र),व्हीएसडी (हृदयाच्या खालच्या दोन कप्प्यांमधील छिद्र) आणि पीडीए (जन्मानंतर बंद होणे अपेक्षित असलेली रक्तवाहिनी उघडी राहणे) या आजारांवरील उपचार करण्यात आले. तसेच चार महिन्याच्या बालकावर बलून पल्मोनरी व्हॉल्व्ह्युलोप्लास्टी ही प्रक्रिया करण्यात आली.या विशेष उपचार सत्रात चार वर्षांच्या बालीका व वय १३ वर्षे बालक यांच्यावर एएसडी तर वय ७ वर्षे बालक यांच्यावर व्हीएसडी संदर्भातील शस्त्रक्रिया, चार महिन्यांच्या बालक व चार वर्षांची बालीका यांच्यावर पीडीए संदर्भातील प्रक्रिया, तर ६२ वर्षीय महिलेावर एएसडी संदर्भातील प्रक्रिया करण्यात आली. तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाचे योगदान या उपचार प्रक्रियेत डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ. वैभव पाटील, अपोलो हॉस्पिटल, मुंबई येथील डीएम पेडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट डॉ. भूषण चौहान, पेडियाट्रिक कार्डिओलॉजी फेलोशिप प्राप्त डॉ. धवल खडके आणि डॉ. मनमिता रेड्डी यांनी सहभाग घेतला. भूलतज्ज्ञ डॉ. रघुनाथ भारते, ज्युनिअर डॉक्टर डॉ. विदिशा जाधव, डॉ. शांतनू तायडे व डॉ. मोहित पाटील, तसेच बालरोग विभागातील डॉ. नीरज जगताप, डॉ. अस्मिता आणि डॉ. नावेद खान यांनी सहकार्य केले. कॅथलॅब टेक्निशियन मोहम्मद सिद्दीक, स्टाफ नर्स दीपाली व पायल तसेच जनसंपर्क अधिकारी रत्नशेखर जैन यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली.जन्मजात हृदयविकारांचे वेळीच निदान आणि योग्य उपचार झाल्यास अनेक बालकांना निरोगी आयुष्य जगण्याची संधी मिळू शकते. जळगाव व खान्देश परिसरातील रुग्णांना बालहृदयरोगासारख्या विशेष उपचार सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने महादेव हॉस्पिटलचे हे प्रयत्न महत्त्वपूर्ण ठरत आहेत.









