मंकी कॅपधारी तीन संशयित सीसीटीव्हीत कैद; कटरने कुलूप तोडण्याचा प्रयत्न
जळगाव, ( प्रतिनिधी ) : – जळगाव शहरातील गिरणा पंपिंग रस्त्यावरील श्यामनगर परिसरात चोरट्यांनी एकाचवेळी तीन बंद घरांना लक्ष्य केल्याची घटना उघडकीस आली आहे. दिवाळीच्या सुट्यांमध्ये घरमालक बाहेरगावी असल्याची संधी साधून चोरट्यांनी घरांची कुलुपे तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत सहभागी असलेले मंकी कॅपधारी तीन संशयित परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झाले आहेत. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ही घटना रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्यामनगर परिसरात घडली. दिवाळीच्या सुट्यांमुळे अनेक कुटुंबे बाहेरगावी गेल्याने चोरट्यांनी बंद घरांना लक्ष्य केल्याचे समोर आले आहे. तीन घरांची कुलुपे तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन संशयित मंकी कॅप घालून घरांच्या परिसरात फिरताना दिसत आहेत. त्यातील एकाने कटरच्या साहाय्याने कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याला यश आले नाही. त्यानंतर दुसऱ्या संशयिताने कटरच्या मदतीने कुलूप कापण्याचा प्रयत्न केला. तिसरा संशयित हातात बॅटरी घेऊन परिसरावर लक्ष ठेवताना दिसत आहे. तिघांनी समन्वयाने चोरीचा प्रयत्न केल्याचे फुटेजमधून दिसून येते.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध सुरू केला आहे. संशयितांनी चेहरे झाकलेले असल्याने त्यांची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
दरम्यान, ज्या तीन घरांना लक्ष्य करण्यात आले, त्या घरांचे मालक बाहेरगावी असल्याने घरातील ऐवज चोरीला गेला आहे किंवा नाही, याची अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. घरमालक परतल्यानंतर तपासणी केल्यावर नुकसानीचा नेमका तपशील समोर येणार आहे.
सणासुदीच्या काळात बंद घरांना लक्ष्य करून चोरीचे प्रयत्न होत असल्याने नागरिकांनी घरांच्या सुरक्षिततेबाबत सतर्क राहण्याची गरज आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.








