जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला; एमआयडीसी परिसरातील हॉटेलमधील घटना


लाकडी दांडक्याने डोक्यावर वार करून चाकूने हल्ल्याचा प्रयत्न; एकावर गुन्हा दाखल
जळगाव विशेष प्रतिनिधी
मित्रासोबत झालेले जुने भांडण मिटवल्याचा राग मनात धरून एका तरुणावर लाकडी दांडक्याने व चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील एका हॉटेलमध्ये घडली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किरण शामराव चितळे (वय २८, रा. कृष्णा नगर, सुप्रीम कॉलनी, जळगाव) असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गणेश उर्फ विकी गोसावी (रा. नितीन साहित्य नगर, सुप्रीम कॉलनी, जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास किरण चितळे हे आपल्या मित्रासोबत एमआयडीसी परिसरातील एका हॉटेलमध्ये जेवण करत होते. त्यावेळी आरोपी गणेश उर्फ विकी गोसावी हा हातात लाकडी दांडका घेऊन तेथे आला. “तुला माज आला का, तू आकाश जाधवसोबत का राहतोस?” असे म्हणत आरोपीने हातातील लाकडी दांडक्याने किरण यांच्या डोक्यावर ३ ते ४ वेळा जोरदार प्रहार केले. या हल्ल्यामुळे किरण यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला.
किरण यांनी दांडका पकडण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने कमरेचा धारदार चाकू काढून “तुला आताच संपवतो” अशी धमकी देत त्यांच्यावर वार केला. किरण यांनी तो वार चुकवल्यामुळे चाकू त्यांच्या शर्टावर लागून शर्ट फाटला.
वेटर आणि ग्राहकांमुळे वाचला जीव
हल्ल्यादरम्यान किरण यांनी आरडाओरड केल्याने हॉटेलमधील वेटर आणि ग्राहकांनी तातडीने मध्यस्थी करत आरोपीला आवरले. तेथे नागरिकांची गर्दी जमल्याचे पाहून आरोपी घटनास्थळावरून पळून गेला.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी घटनास्थळाला भेट दिली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९, ११८(१), ३५१(२), ३५२ अन्वये खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे करत आहेत.









