जळगाव (प्रतिनिधी) – गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूल, जळगाव येथे सायन्स क्लब अंतर्गत बेल लॅबोरेटरी अमेरिका येथील शास्त्रज्ञ डॉ.सुनील पाटील यांचे नवकल्पना आणि सर्जनशीलता या विषयावर १ व २ नोव्हेंबर रोजी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
प्रमुख अतिथी व मार्गदर्शक डॉ. सुनील पाटील यांनी २२ वर्षे अमेरिकेमध्ये काम केले आहे. त्यानंतर ते पुणे येथील सिम्बॉयसिस युनिव्हर्सिटी मध्ये दहा वर्ष कार्यरत होते. त्यांनी जगभरामध्ये तसेच भारतामध्ये एज्युकेशन सिस्टीम या विषयावर सखोल असे काम केले आहे व त्याद्वारे सर्वांना मार्गदर्शन करीत आहे. तसेच त्यांनी एम्पॉवररिंग ऑफ फॅकल्टी इन इंजिनिअरींग एज्युकेशन या विषयावर पुस्तकाचे लिखाण केले आहे. दोन दिवसाच्या कार्यशाळेमध्ये पहिल्या दिवशी त्यांनी ३० शिक्षकांना अनमोल मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनात त्यांनी शिक्षकांना सांगितले की, एक वेळा अपयश आल्यानंतर घाबरून जाऊ नका, पुन्हा हिंमतीने उभे रहा, विजय तुमचाच आहे, स्वतःवर विश्वास ठेवा , लोकांचं ऐका आणि संवाद साधा, आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक रहा, आपले काम वेळेवर करा, शिक्षक म्हणजे सर्वात मोठी जबाबदारी मुलांना घडवण्याची, मुलांना क्रिएटिव्ह बनवण्याची, त्यांची इच्छाशक्ती वाढवण्याची. शिक्षक जेवढे नाविण्यपूर्ण आणि सर्जन सर्जनशीलतेने परिपूर्ण असतील तेवढेच मुलंही. अशा बर्याचशा वेगवेगळ्या गोष्टींवर त्यांनी चर्चा केली. त्याचप्रमाणे शिक्षकांशी संवाद साधताना विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी समर्पक उत्तरे दिली. तसेच दुपारच्या वेळेस इयत्ता आठवी ते दहावीतील सर्व विद्यार्थ्यांचीही त्यांनी संवाद साधला आणि मुलांच्या मनातील शंकांचे निरसन केले.
गुरुवार दिनांक २ नोव्हेंबर रोजी डॉ.सुनील पाटील यांनी इयत्ता आठवी ते दहावीतील ५० मुलांची एका विशिष्ट पद्धतीने निवड केली. ५० विद्यार्थ्यांना एक संशोधन कार्य त्यांनी दिले ते संशोधन कार्य पूर्ण करण्यासाठी त्यांना सहा महिन्याचा अवधी दिला आहे. या संशोधन कार्यातून त्यांनी मुलांमध्ये असणार्या सुप्त गुणांना उजागर करण्याचा प्रयत्न केला आहे. संशोधन कार्य देण्याआधी त्यांनी वेगवेगळ्या गोष्टींवर विद्यार्थ्यांशी चर्चा केली. विद्यार्थ्यांना पडलेल्या प्रश्नांची त्यांनी समर्पक उत्तरे दिली. यावेळी विविध मुद्दे उदाहरणासहित समजावून सांगितले. विद्यार्थ्यांना लहरीं चाट जीपीटी या अॅडव्हान्स टेक्नॉलॉजीची माहिती दिली. या कार्यशाळेचे आयोजन स्कूलच्या समुपदेशक लीना चौधरी, विज्ञान विभागाच्या प्रिया चौधरी यांनी स्कूलच्या प्राचार्य नीलिमा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली केले. या कार्यक्रमाबद्दल गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील, डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील यांनी कौतुक केले.