दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक; शिक्षण क्षेत्रात हळहळ
अमळनेर (प्रतिनिधी) : अमळनेर येथील जय योगेश्वर ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक अनिल दयाराम पाटील यांचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना १३ जून रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ढेकू रोडवरील पोलीस ठाण्याजवळ घडली. या घटनेमुळे अमळनेर शहरासह त्यांच्या मूळ गावी तरवाडे येथे शोककळा पसरली आहे.


प्रा. पाटील हे त्यांच्या दुचाकीने (एमएच-१९ बीएक्स-९५१३) तरवाडे या गावी गेले होते. तेथून अमळनेरकडे परतत असताना ढेकू रोडवरील पोलीस ठाण्याजवळ त्यांचा अपघात झाला. अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
अपघातानंतर प्रा. पाटील यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलवून शवविच्छेदन करण्यात आले.
या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.प्रा. अनिल पाटील यांच्या पश्चात दोन भाऊ, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. शांत, मनमिळावू आणि विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या प्रा. पाटील यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रासह तरवाडे आणि अमळनेर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.









