अडावद, ता. चोपडा (प्रतिनिधी) : अडावदजवळील चांदसणी येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत सुमारे ७२ हजार रुपये किमतीचे ३६ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली.


चांदसणी येथील शेतकरी प्रकाश रामदास पाटील (वय ४८) हे उन्हाळ्यामुळे कुटुंबासह घराच्या अंगणात झोपले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागील बाजूच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर किचनमधील कपाटाचे दरवाजे तोडून लॉकरमध्ये ठेवलेले सुमारे ३६ ग्रॅम वजनाचे आणि अंदाजे ७२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले.
शनिवारी सकाळी चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. याप्रकरणी प्रकाश पाटील यांच्या फिर्यादीवरून अडावद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.









