पत्नीला घेण्यासाठी गेला अन् सासरच्यांशी भिडला; कुसुंब्यात जावई-सासरच्या मंडळींत तुफान हाणामारी

शालकाचा मेहुण्यावर चाकूने वार; परस्परविरोधी तक्रारींवरून पाच जणांविरुद्ध गुन्हे
जळगाव : माहेरी गेलेल्या पत्नीला घेण्यासाठी सासरी गेलेल्या जावयाचा सासरच्या मंडळींशी वाद होऊन तुफान हाणामारी झाली. या घटनेत शालकाने मेहुण्यावर चाकूने वार केला, तर मेहुण्याने सासरा, सासू व शालकाला मारहाण केल्याची तक्रार आहे. ही घटना १ नोव्हेंबर रोजी तालुक्यातील कुसुंबा येथे घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
कुकरने सासऱ्याला मारहाण
कुसुंबा येथील संजय भिमराव जाधव (वय ४२) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा जावई चंद्रकांत ईश्वर बाविस्कर (रा. बांभोरी) हा पत्नीला घेण्यासाठी घरी आला होता. मात्र, पत्नीने त्याच्यासोबत जाण्यास नकार दिल्याने चंद्रकांत याला राग आला. त्यातून त्याने कुकरने सासरे संजय जाधव यांच्या डोक्यात, पाठीवर व पायावर मारून त्यांना दुखापत केली. तसेच सासू व शालकालाही शिवीगाळ करून मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
सासऱ्याने पकडले, शालकाने चाकूने वार केले
दुसरीकडे, चंद्रकांत बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते पत्नीला घेण्यासाठी सासरी गेले असता सासरे संजय जाधव यांनी त्यांना पकडून ठेवले. त्यानंतर शालक भूषण जाधव याने चाकूने वार करून दुखापत केली. तसेच सासू भारती जाधव व लहान सासूनेही मारहाण केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
या परस्परविरोधी तक्रारींवरून पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत








