जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील म्हसावद येथील तरुणाचा गिरणा नदीच्या पात्रात बुडाल्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दि. १८ जुलै रोजी घडली आहे. सकाळी १०. ३० वाजेपासून त्याच्या मृतदेहाचा शोध सुरु होता. दुपारी साडेतीन वाजता शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला त्याचा मृतदेह हाती लागला. एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.
शासनाची आपत्ती व्यवस्थापन विभागाची टीम व गावातील सरपंच, उपसरपंच, नागरिक.
किशोर श्रावण मराठे (वय ३८, रा. खर्चे नगर, म्हसावद ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो मंगळवारी सकाळी १० वाजता गावाजवळ असलेल्या गिरणा नदी येथे पोहण्यासाठी गेला होता. तेथे पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला. नदीकाठावर कपडे धुणाऱ्या महिलांच्या लक्षात येताच, त्यांनी गावात सरपंचांना खबर दिली. तसेच, पोलिसांनाही माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र त्याचा मृतदेह मिळून येत नव्हता.
अखेर मुक्ताईनगर येथील आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाला पाचारण करण्यात आले. विभागातील मनोज भोई , किशोर भोई, प्रविण भोई, योगेश भोई, गोपाल भोई, राजेंद्र भोई, विशाल बोरोले यांनी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास मयत किशोर मराठे याचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर एम आय डी सी पोलिस प्रदिप पाटील, स्वप्निल पाटील यांनी त्याचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रवाना केला. तेथे मृताच्या नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. मयत किशोर मराठे याच्या पश्चात आई, पत्नी, १ मुलगी, २ भाऊ असा परिवार आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.