पाळधीच्या क.द.नाईक माध्यमिक विद्यालयात वर्धापनदिनानिमित्त उपक्रम
जामनेर (प्रतिनिधी) – शेंदुर्णी एज्युकेशन संस्थेच्या क.द.नाईक माध्यमिक विद्यालय पाळधी या संस्थेचा ७९ वा वर्धापन दिन दिनांक १७ जुलै रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पाळधीचे ग्रामस्थ अशोक धना बाविस्कर तर प्रमुख पाहुणे पद कैलास एकनाथ पाटील यांनी भूषविले.
कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता सरस्वती, गुरुवर्य हरिप्रसाद महाराज, संस्थेचे आद्य प्रवर्तक आचार्य गजाननराव गरुड, भास्करराव गरुड यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक पी. एस. पाटील सर यांनी केले. यानंतर विद्यार्थ्यांची वर्धापन दिनानिमित्त समायोजित भाषणे झाली. विद्यार्थ्यांना गणवेशाचे व शालेपयोगी वह्यांचेही प्रतिकात्मक वाटप करण्यात आले. यानंतर अध्यक्षांनी मनोगत व्यक्त केले. मनोगतात शाळेचा वर्धापन दिन साजरा करण्याचे प्रयोजन त्यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणानंतर पहिल्या सत्राचा समारोप झाला.
दुसऱ्या सत्रात जळगाव जिल्हा प्रधान सचिव प्रल्हाद बो-हाडे व जामनेर शाखा महिला सहभाग विभाग शोभा बो-हाडे यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन व चमत्कार सादरीकरण केले. सर्वप्रथम कार्यक्रमाचे उद्घाटन पाण्याने दिवा पेटवून करण्यात आले. तसेच मंत्रशक्तीने अग्नी प्रज्वलित करणे, गडव्यात भूत उतरविणे, गंगाजल निर्मिती, तसेच माईंड रीडिंग इत्यादी प्रयोग करण्यात आले व त्यामागील स्पष्टीकरण करण्यात आले. स्पष्टीकरण करत असताना विज्ञानाने माणूस चंद्रावर गेला परंतु अंधश्रद्धेतून अजून मुक्त नाही झाला. तसेच मानवाने मंगळावर यान पाठविले परंतु मंगळाची भीती मनातून कमी झाली नाही. आपण सर्वजण विज्ञान शिकतो पण त्याचा वापर जीवनात करत नाही ही खंत त्यांनी व्यक्त केली. यापुढे सर्वांनी घराबाहेर पडताना डोळे सतत उघडे ठेवावे, डोके चालवावे, प्रश्न विचारावा असे मनोगत व्यक्त केले.
तिसऱ्या सत्रात लोकरंजन बहुउद्देशीय संस्था जामनेर यांनी संस्थेचे अध्यक्ष संतोष सराफ सह शिवाजी डोंगरे, मिठाराम जोगी, हरी लोहार, नारायण लोहार यांनी व्यसनमुक्ती, मुलगा-मुलगी भेद, अंधश्रद्धा यावर पथनाट्याचे सादरीकरण केले. पथनाट्य सादरीकरण करतांना श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. सुमारे ५०० विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.जे.सोनवणे तर आभार प्रदर्शन एन.टी.पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी जेष्ठ शिक्षक एस.एन. पाटील, एस.बी. सपकाळ, एन.बी. सुशीर, वाय.एस. पाटील, एस.एस. पाटील, एस.के. बाविस्कर मॅडम, ए.एन. पाटील मॅडम व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.