बंद घराचे कुलूप तोडून ५५ हजारांची रोकड लंपास
सावदे प्रचा येथील घटना; अज्ञात चोरट्यांविरुद्ध धरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल
धरणगाव | प्रतिनिधी : धरणगाव तालुक्यातील सावदे प्रचा येथे बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करत कपाटातील ५५ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली. ही घटना २१ ऑगस्टच्या रात्री ते २२ ऑगस्टच्या सकाळदरम्यान घडली.


कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावदे प्रचा येथील रहिवासी शरद काशिनाथ पवार (वय ३८) यांच्या घराला चोरट्यांनी लक्ष्य केले. २१ ऑगस्ट रोजी रात्री १० ते २२ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंद घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला.
त्यानंतर बेडरूममधील लाकडी कपाटाचे लॉक तोडून त्यात ठेवलेली ५००, २०० आणि १०० रुपयांच्या नोटांच्या स्वरूपातील एकूण ५५ हजार रुपयांची रोकड चोरून नेली.
धरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल
चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर शरद पवार यांनी धरणगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(४) व ३०५(क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू असून, या प्रकरणाचा तपास पोहेकॉ. क्र. २८८१ संदीप खंडारे करीत आहेत.









