
मृतदेह पाचोरा तालुक्यात बहुळा धरणात फेकल्याची कबुली
पाचोरा (प्रतिनिधी) – : शेतीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथे कन्नड येथील व्यावसायिकाचा खून केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. गेल्या सहा दिवसांपासून बेपत्ता असलेले डॉ. संजय मनोहर तेली (वय ५२, रा. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) यांची हत्या झाल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी जळगाव स्थानिक गुन्हे शाखा आणि पाचोरा पोलिसांनी कारवाई करत दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, गुन्ह्याचा उलगडा केला आहे.


प्राथमिक माहितीनुसार, डॉ. संजय तेली हे वैद्यकीय व्यवसायासोबतच जमीन खरेदी-विक्रीचा व्यवहारही करत होते. गोराडखेडा येथील राहुल धर्मराज पाटील यांची दोन एकर जमीन १ कोटी २ लाख ५० हजार रुपयांना खरेदी करण्याचा व्यवहार ठरला होता. त्यापोटी डॉ. तेली यांनी राहुल पाटील यांना ८० लाख रुपयांचा बयाणा दिला होता. दि. १७ नोव्हेंबर रोजी डॉ. तेली कन्नड येथून चारचाकी वाहनाने मुलीसोबत निघाले होते. मुलीला जळगाव येथील गोदावरी मेडिकल कॉलेज येथे सोडल्यानंतर ते पिंपळगाव हरेश्वर येथे आपल्या शालकाकडून ५ लाख रुपये घेण्यासाठी गेले.
त्यानंतर सांगवी (प्र. लोद) येथील घरी जाऊन ३ लाख १० हजार रुपये ठेवले आणि उर्वरित १ लाख ९० हजार रुपये घेऊन दि. १८ नोव्हेंबर रोजी गोराडखेडा येथे राहुल पाटील याच्याकडे गेले. जमीन व्यवहारावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. या वादातून राहुल पाटील याने डॉ. तेली यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने हल्ला केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
त्यानंतर राहुल पाटील याने आपल्या सालदाराच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून नजीकच्या बहुळा धरणात फेकून दिल्याची कबुली दिल्याचे समजते. डॉ. संजय तेली हे १८ नोव्हेंबरपासून बेपत्ता असल्याने नातेवाईकांनी पाचोरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांचा शोध घेण्यासाठी १ लाख २१ हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. अखेर तपासाची चक्रे फिरवून स्थानिक गुन्हे शाखा आणि पाचोरा पोलिसांनी राहुल धर्मराज पाटील व त्याच्या सालदाराने संगनमताने खून केल्याचे निष्पन्न केले.
संशयितांनी दिलेल्या माहितीच्या आधारे दि. २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजल्यापासून बहुळा धरणात डॉ. तेली यांच्या मृतदेहाचा शोध घेण्याची मोहीम रात्री उशिरापर्यंत सुरू होती. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमल्याने बंदोबस्तासाठी आरसीपी प्लाटूनसह पाचोरा पोलिस ठाण्याचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
आज सोमवार दि. २३ रोजी सकाळी ७.वाजेच्या सुमारास बहुळा धरणात डॉ तेली यांचा मृतदेह सापडला असुन शवविच्छेदनासाठी त्याला पाठवले जात आहे. या प्रकरणी पाचोरा पोलीस पुढील तपास करीत आहे.








