
जळगाव ( प्रतिनिधी ) – नव्या आखणीमुळे रिंग रोडच्या कामाला विलंब होऊ शकतो. त्यामुळे ३० मीटर रुंदीच्या रिंग रोडची मंजूर आराखड्यातील मूळ आखणी कायम ठेवावी, अशी मागणी नगरसेवक अरविंद देशमुख यांनी महापालिकेच्या विशेष महासभेत केली. मूळ व वाढीव हद्दीतील रस्ते आणि आरक्षणांचे बदल नकाशावर दाखवावेत. बाधित भूखंडांची यादी, आरक्षित जागा ताब्यात घेण्याचे वेळापत्रक आणि हरकतींवरील निर्णय लेखी द्यावेत, असेही त्यांनी सांगितले.
नगररचना विभागप्रमुख अमोल पाटील खरोखर महिनाभर रजेवर होते का? त्या काळात ते कोणाच्या संपर्कात होते? असे सवाल देशमुख यांनी उपस्थित केले. प्रारूप आराखड्यातील बदलांमधून शहरातील काही भूखंड व्यावसायिकांना लाभ मिळवून देण्यासाठी त्या काळात नियोजन केल्याचा आरोप त्यांनी केला. रजेच्या नोंदी, बैठका, अधिकृत पत्रव्यवहार आणि आराखड्यातील बदलांची स्वतंत्र चौकशी करून लेखी अहवाल द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.










