
नागादेवी व जामुनझिरा पाड्यांतील नागरिकांची पायपीट थांबवा; दिवसातून किमान दोन वेळा बसफेऱ्या सुरू करण्याची मागणी
यावल ( प्रतिनिधी ) : – यावल तालुक्यातील आदिवासी पाड्यांवर राहणाऱ्या नागरिकांना आजही नियमित बससेवेअभावी मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. नागादेवी आणि जामुनझिरा या आदिवासी वस्त्यांपर्यंत यावल एसटी आगारातून नियमित बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी तालुक्यातील आदिवासी बांधवांसह प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
यावल आगारातून दहिगाव-सावखेडा सीम परिसरासाठी नियमित बससेवा सुरू आहे. मात्र, या मार्गावरील नागादेवी व जामुनझिरा या आदिवासी वस्त्यांपर्यंत पुरेशी बससेवा उपलब्ध नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या दोन्ही वस्त्या मुख्य मार्गापासून साधारण चार ते चार किलोमीटर अंतरावर असून, प्रत्येक वस्तीत सुमारे पाचशे ते सहाशे आदिवासी नागरिक वास्तव्यास आहेत.
बससेवेअभावी येथील नागरिकांना बाजारपेठेत जाण्यासाठी पायी प्रवास करावा लागतो. विशेषतः महिला, वृद्ध नागरिक, विद्यार्थी आणि दैनंदिन कामानिमित्त प्रवास करणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. सावखेडा सीम येथून नागादेवीसाठी तसेच दहिगाव येथून जामुनझिरासाठी दिवसातून किमान दोन वेळा बसफेऱ्या सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.
या परिसरातील आदिवासी नागरिकांना दहिगाव येथे बाजारपेठेसाठी वारंवार यावे लागते. तसेच शेतकरीही शेतीच्या कामासाठी या मार्गाने प्रवास करतात. नियमित बससेवा उपलब्ध झाल्यास विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांची पायपीट थांबण्यास मदत होणार आहे.यावल एसटी आगाराने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन नागादेवी व जामुनझिरा या आदिवासी पाड्यांसाठी दिवसातून किमान दोन बसफेऱ्या सुरू कराव्यात. ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एसटी महामंडळाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.










