कुऱ्हाडदे रस्त्यावरील जीर्ण सार्वजनिक शौचालय हटवून अन्यत्र उभारा


शिरसोलीत ग्रामस्थ आक्रमक, बुधवारी तीव्र आंदोलनाचा दिला इशारा
जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र. न. येथील कुऱ्हाडदे रस्त्यालगत असलेले सार्वजनिक शौचालय अत्यंत जीर्ण अवस्थेत असून, ते तात्काळ पाडून अन्य योग्य ठिकाणी नवीन शौचालय उभारण्यात यावे, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला या आधी दोन वेळेस निवेदन देण्यात आली असून , तातडीने कारवाई न झाल्यास येत्या बुधवारी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
इंदिरानगर परिसरातील ग्रामस्थांनी या सार्वजनिक शौचालयाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. त्यातून येणाऱ्या भयानक दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शौचालयाच्या सेफ्टी टँकमधून मैला बाहेर पडत असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरली आहे, ज्यामुळे स्थानिक रहिवाशांना गंभीर त्रास सहन करावा लागत आहे.
विशेष म्हणजे, या जीर्ण शौचालयाच्या बाजूलाच खोखली मातेचे मंदिर असून, आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर निवासी वस्ती आहे.सदर शौचालयाच्या सेफ्टी टँकमधून दुरगंधी पाणी रहिवाशांच्या घरात पर्यंत जात आहे. हे शौचालय सध्याच्या जागी असणे नागरिकांच्या आरोग्याच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने अयोग्य ठरत आहे. यापूर्वी या शौचालयाच्या उघड्या खड्ड्यात एक गाय पडून गंभीर जखमी झाल्याची घटना देखील घडली होती. ग्रामस्थांनी मोठ्या प्रयत्नांनी तिची सुटका केली होती,
मात्र तरीही ग्रामपंचायत प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केले.शौचालय पूर्णपणे जीर्ण झाल्याने भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे येत्या बुधवारी स्थानिक नागरिक शिरसोली प्र.न. ग्रामपंचायतीवर मोर्चा नेन्याच्या तयारीत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन ठोस निर्णय घ्यावा, हे शौचालय पाडून अन्यत्र दुसऱ्या जागेवर नव्याने उभारावे, अन्यथा येत्या काही काळात मोठी दुर्घटना झाली याला ग्रामपंचायत जबाबदार राहील इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे.









