नंदुरबार एलसीबीची यशस्वी कारवाई, १३ गुन्हे उघड
नंदूरबार (प्रतिनिधी) – नंदूरबार, जळगाव जिल्ह्यासह,गुजरात राज्यात महिलांची धुमस्टाईल सोन्याची चैन चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून ७ लाखांच्या मुद्देमालासह १३ गुन्हे उघड आणण्यात यश आले आहे. मागील काही दिवसांपासून नंदुरबार तसेच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात सोनसाखळी चोरीचे गुन्हे घडत होते. नंदुरबार शहरातील उपनगर परिसरातील गिरीविहार गेट भागात एकापाठोपाठ 2 सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्यामुळे धुमस्टाईल सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांमधील आरोपीतांना अटक करून मुद्देमाल हस्तगत करण्याचे आव्हान पोलीसांसमोर होते.
रजनी सुधीर पाटील (रा.जनता पार्क लिंकरोड, नवापुर) यांच्या दुकानात दि. ११ जुलै रोजी दुपारी दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या दुकानात खरेदी करण्याच्या बहाण्याने त्यांना बोलण्यांत गुंतवुन ठेवले. एका इसमाने त्यांच्या गळयातील सोन्याची मंगलपोत ही जबरीने ओढुन नेल्याने त्यांनी नवापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे दोन वेगवेगळे पथके तयार करुन घडलेल्या गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यातील आरोपी व मुद्देमाल हस्तगत करणेबाबत आदेशीत केले. स्थानिक गुन्हे शाखेचे व नवापूर पोलीस ठाण्याची पथके नवापुर ते विसरवाडी पोलीस ठाणे व नवापुर ते सोनगढ (गुजरात राज्य) या रस्त्यावर गस्त तसेच नाकाबंदी करीत होते.
आर. टी.ओ. नाका, नवापुर येथे एक संशयीत वाहन सोनगढ ते महाराष्ट्र राज्याकडे भरधाव वेगाने येतांना दिसले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला असता सदर वाहन चालकाने वाहन न थांबविता नाकाबंदी चुकवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. म्हणून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला संशय आल्याने सदर वाहनाचा पाठलाग करुन वाहनास काही अंतरावर थांबविले. वाहनातील अब्बास ईबाबत शेख, सादीक ईबाबत शेख (दोन्ही ईराणी, रा. रजा टॉवर जवळ, पापानगर, भुसावळ, जि. जळगाव), सखी मोहम्मद खान (ईराणी. रा. मुस्लीम कॉलनी, भुसावळ), एक अल्पवयीन मुलगा तसेच वाहन चालक अनिल शामराव सोनवणे (रा. अंजाळा ता. यावल जि.जळगाव) यांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांचे वर्णन नवापुर शहरातील जनतापार्क येथे झालेल्या सोनसाखळी चोरीतील अज्ञात इसमांशी मिळतेजुळते होते.त्यांची अधिक विचारपूस केली असता त्यांनी नवापुर शहरात जनतापार्क येथे त्यांचा एक साथीदाराच्या मदतीने मोटर सायकल वाहनावर अब्बास शेख (इराणी) व एक अल्पवयीन मुलाने मिळून एका दुकानातील महिलेच्या गळ्यातून चैन ओढून पळून गेल्याचे सांगितले. तसेच त्यांना इतर ठिकाणी कोठे या प्रकारचे गुन्हे केले आहे काय ? या बाबत विचारपुस केली असता त्यांनी ११ रोजीच गुजरात राज्यातील व्यारा शहरात व पलसाणा शहरात अब्बास इबाबत शेख (इराणी) व त्यांच्या फरार साथीदाराच्या मदतीने महिलांच्या गळ्यातून सोनसाखळी चैन ओढून पळून गेल्याबाबत सविस्तर माहिती दिली.
ताब्यात घेण्यात आलेले इसम व वाहनाची तपासणी केली असता ९० हजार रु. कि. ची एक २० ग्रॅम वजनाची गळ्यातील मंगलपोत, ६७ हजार ५०० रु. कि.ची एक काळे मणी असलेली १५ ग्रॅम वजनाची गळ्यातील मंगलपोत, ३२ हजार ५०० रु. किं.चे ५ विविध कंपनीचे मोबाईल, ५ लाख रु. कि.ची एक मारुती सुझुकी कंपनीची डिझायर पांढऱ्या रंगाची ( एम.एच.१९, सी.यु. ६४८९) हि कार जप्त करण्यात आली आहे. तसेच ताब्यातील संशयीत आरोपींनी नंदुरबार व जळगांव जिल्ह्यात सोनसाखळी चोरीचे गुन्हे केल्याची सविस्तर माहिती दिली. त्याबाबत माहिती घेतली असता नवापुर, उपनगर, नंदूरबार शहर २, जळगाव तालुका पोलीस ठाणे, चोपडा शहर, भुसावळ बाजारपेठ,चाळीसगाव शहर, पलसाना (गुजरात) पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून हे गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.
पाचही संशयित आरोपीतांना गुन्ह्याच्या ढील तपासकामी नवापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेला सादीक ईबाबत शेख ( ईराणी) यांच्या विरुद् जळगांव, बीड, बुलढाणा, अहमदनगर व मध्य प्रदेश राज्यातील देवास जिल्ह्यात असे एकुण 32 गुन्हे, अब्बास अली ईबाबत अली यांच्याविरुध्द १ गुन्हा, सखी मोहम्मद ईराणी याच्याविरुध्द् २ गुन्हे, अल्पवयीन मुलाविरुध्द मालमत्तेविरुध्दचे २ गंभीर गुन्हे दाखल आहेत. कौशल्यपूर्वक तपास करुन जबरी चोरीसारखा मालमत्तेविरुध्दचा आव्हानात्मक गंभीर गुन्हा अवघ्या चार तासात उघड करुन नवापूर येथील गुन्ह्यातील व गुजरात राज्याच्या पलसाना येथे झालेल्या घटनेतील मुद्देमाल हस्तगत करुन उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्थानिक गुन्हे पथकाला पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी रोख बक्षीस जाहीर केले.
सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उप निरीक्षक हेमंत मोहिते, पोलीस हवालदार महेंद्र नगराळे, जितेंद्र तांबोळी, पोलीस नाईक राकेश मोरे, मोहन ढमढेरे, जितेंद्र तोरवणे, हेंमत सैंदाणे, पोलीस अंमलदार विजय ढिवरे, अभय राजपुत, आनंदा मराठे यांच्या पथकाने केली आहे.