चौकशीत उत्पन्नापेक्षा ४७ टक्के अधिकची मालमत्ता आढळली, भ्रष्टाचाऱ्यांना चाप
पुणे (प्रतिनिधी) – ज्ञात उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता बाळगल्याप्रकरणी जात पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य नितीन ढगे आणि त्यांच्या पत्नीविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी १३ जुलै रोजी गुन्हा दाखल केल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उपअधीक्षक माधुरी भोसले यांनी वानवडी पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे.
यात म्हटले आहे की, जात पडताळणी समितीचे नितीन ढगे यांचेविरुध्द ला.प्र.वि.पुणे यांच्याकडून सन २०२१ मध्ये सापळा कारवाई करण्यात आली होती. त्यावरुन वानवडी पो. स्टे. १६ ऑक्टोबर २०२१ रोजी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर त्यांचे रहाते घराचे घर झडतीमध्ये रक्कम १ कोटी २८ लाख ४९ हजार रुपये रोख मिळुन आल्याने त्यांच्या मालमत्तेची उघड चौकशी सन २०२१ मध्ये चालु करण्यात आली होती. उघड चौकशीअंती लोकसेवक नितीन ढगे यांनी ज्ञात उत्पन्नापेक्षा ४७ टक्के जास्त इतकी अपसंपदा भ्रष्ट मार्गाने धारण केल्याचे निष्पन्न झाले.
लोकसेवक नितीन ढगे यांना त्यांची पत्नी प्रतिभा नितीन ढगे यांनी अपप्रेरणा दिली. तसेच कागदपत्रामध्ये खोटी माहिती भरुन वापरुन शासनाची फसवणुक केली म्हणुन लोकसेवक नितीन ढगे व त्यांची पत्नी प्रतिभा ढगे यांच्याविरुध्द उघड चौकशीअंती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुण्यातील वानवडी पोलीस स्टेशनला तत्कालीन उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, पुणे नितिन चंद्रकांत ढगे (वय ४१ वर्षे) व त्यांच्या पत्नी प्रतिभा नितीन ढगे (वय ३५) रा. वानवडी, पुणे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक सुदाम पाचोरकर हे करत आहेत.