चाळीसगाव शहरात खरजई नाका येथील घटना
चाळीसगाव ( प्रतिनिधी ) : शहरांतील खरजई नाका परिसरात एका हळदीच्या कार्यक्रमात किरकोळ वादातून दोन तरुणांवर लोखंडी कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात रोहित पवार आणि महेश पवार हे दोन भाऊ गंभीर जखमी झाले असून, चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दोघा संशयितांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी रोहित भारत पवार (वय २४, रा. नवेगाव, टाकळी प्र.चा.) हे २५ एप्रिल रोजी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास खरजई नाका परिसरातील त्यांचे मित्र चंद्रकांत पाटील यांच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी गेले होते. यावेळी कार्यक्रमाच्या ठिकाणी संशयित आरोपी तन्मय मोरे आणि रोहित चौधरी (दोघे रा. चाळीसगाव) हे इतर लोकांशी विनाकारण वाद घालत होते. फिर्यादी रोहित आणि त्यांचा भाऊ महेश पवार हे संशयितांना “वाद घालू नका” असे समजवून सांगण्यासाठी गेले. याचा राग आल्याने संशयितांनी दोघा भावंडांवर हल्ला चढवला.
वाद विकोपाला गेल्यावर संशयितांनी रोहित आणि महेश यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने जवळ असलेल्या लोखंडी कोयत्याने डोक्यावर, खांद्यावर आणि कमरेवर वार करून गंभीर दुखापत केली. इतकेच नव्हे तर भांडण सोडवण्यासाठी आलेल्या रोहित यांच्या आई मिराबाई पवार आणि बहीण योगिता बोरसे यांनाही संशयितांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. “आमच्या नादी लागले तर मारून टाकू” अशी धमकी देत परिसरात दहशत निर्माण केली.
या प्रकरणी रोहित पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित तन्मय मोरे आणि रोहित चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो.उप.नि. संदीप घुले करीत आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.









