चोपडा (प्रतिनिधी):- चोपडा शहरातील मुख्य रस्त्यावरील एका सराफा दुकानात ग्राहक बनून आलेल्या तिघा अज्ञात चोरट्यांनी तब्बल ६ लाख ४८ हजार रुपयांचे सोन्याचे पेंडल लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मेन रोडवरील महावीर ब्रदर्स या सोन्या-चांदीच्या दुकानात ९ जून रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजेच्या सुमारास तीन अज्ञात व्यक्ती ग्राहकाच्या वेशात आले होते. त्यांनी सोन्याचे लेडीज पेंडल पाहण्याच्या बहाण्याने दुकानातील कर्मचाऱ्यांना गुंतवून ठेवले.
याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी ८१ ग्रॅम वजनाचे, प्रत्येकी ३ ग्रॅम वजनाचे २७ सोन्याचे लेडीज पेंडल असलेले प्लास्टिकचे पाकीट हातचलाखीने चोरून नेले. चोरीस गेलेल्या दागिन्यांची किंमत सुमारे ६ लाख ४८ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
ही घटना लक्षात आल्यानंतर दुकानाचे मालक महावीर उमेदमल जैन (वय ४९) यांनी चोपडा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये तीन अज्ञात आरोपींविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस निरीक्षक पवन प्रतापराव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी पुढील तपास करीत आहेत.









