यावल (प्रतिनिधी):- शहरातील देशमुख वाडा परिसरातील ६५ वर्षीय वृद्धाने दीर्घकालीन आजाराला कंटाळून अंजाळे गावाजवळील मोर नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे यावल शहरात हळहळ व्यक्त होत आहे.


वसंत अर्जुन माळी (वय ६५, रा. देशमुख वाडा, लहान मारुती मंदिराजवळ, यावल) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ते गेल्या काही काळापासून आजाराने त्रस्त होते. मंगळवारी सायंकाळी ते घराबाहेर निघून गेले होते. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला, मात्र त्यांचा कुठेही मागमूस लागला नाही.
दरम्यान, अंजाळे गावाजवळील मोर नदीपात्रात एका वृद्धाने उडी घेतल्याची माहिती नागरिकांकडून कुटुंबीयांना मिळाली. त्यानंतर नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. नदीपात्रातून मृतदेह बाहेर काढून यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला.
याप्रकरणी गोलू माळी यांनी दिलेल्या माहितीनुसार यावल पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
मयत वसंत माळी यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सुना, नातवंडे तसेच मोठा परिवार आहे. ते रवींद्र माळी यांचे वडील तर किशोर उर्फ गोलू माळी आणि राहुल माळी यांचे मोठे काका होते. त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.









