भडगाव तालुक्यातील वसंतवाडी तांड्यावर खळबळ
भडगाव (प्रतिनिधी):- दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिला म्हणून एका पतीने आपल्याच पत्नीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना भडगाव तालुक्यातील वसंतवाडी तांडा येथे घडली आहे. रविवारी (दि. २६) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडलेल्या या थरारामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या जीवघेण्या हल्ल्यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून, पोलिसांनी आरोपी पतीला तातडीने ताब्यात घेतले आहे.

संशयित आरोपी

मिळालेल्या माहितीनुसार, वसंतवाडी तांडा येथील रहिवासी आत्माराम पतीलाल राठोड (वय ४०) याला दारूचे व्यसन होते. रविवारी सकाळी त्याने आपली पत्नी ललिता आत्माराम राठोड (वय ३६) हिच्याकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली होती. मात्र, ललिता यांनी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. याच कारणावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. या वादाचे पर्यवसान थेट हत्येत झाले. पैशांच्या नकाराने संतप्त झालेल्या आत्माराम याने घरात असलेल्या चाकूने ललिता यांच्या पोटावर एकामागून एक सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, गंभीर जखमी झालेल्या ललिता राठोड यांचा अतिरक्तस्रावामुळे घटनास्थळावरच तडफडून मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच भडगाव पोलिसांनी तात्काळ धाव घेत घटनास्थळ गाठले आणि पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपी पती आत्माराम राठोड याला ताब्यात घेतले. घटनेचे गांभीर्य ओळखून फॉरेन्सिक पथकालाही (न्यायवैद्यक शाखा) पाचारण करण्यात आले होते. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून रक्ताचे नमुने आणि इतर महत्त्वाचे कायदेशीर पुरावे संकलित केले आहेत.
दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी भडगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. या घटनेप्रकरणी मृत ललिता यांचे भाऊ प्रकाश मेहराम चव्हाण (रा. दळवेल, ता. पारोळा) यांनी भडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी आत्माराम राठोड याच्याविरुद्ध भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २४०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मी कारंकार करत आहेत.









