सामाजिक वनीकरण विभागातील अधिकाऱ्यावर एसीबीची कारवाई; चाळीसगावात खळबळ
चाळीसगाव (प्रतिनिधी) : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) मंजूर झालेल्या देयकाचे बिल काढून देण्यासाठी ७,५०० रुपयांची लाच स्वीकारताना सामाजिक वनीकरण विभागातील वनपालाला नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहात पकडल्याची कारवाई चाळीसगाव येथे करण्यात आली. या घटनेमुळे शासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

बिल मंजुरीसाठी मागितली होती लाच
मिळालेल्या माहितीनुसार, सामाजिक वनीकरण परिक्षेत्र चाळीसगाव येथील वनपाल प्यारेलाल विठ्ठल महाजन यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांनी मौजे तरवाडे (ता. चाळीसगाव) येथे चंदन वृक्ष लागवड व संवर्धनासाठी शासनाच्या मनरेगा योजनेअंतर्गत अर्ज केला होता.
साडेचार लाखांचा निधी मंजूर
सदर अर्ज मंजूर झाल्यानंतर तक्रारदारास वृक्ष लागवड व संवर्धनासाठी प्रतिवर्ष १ लाख ५० हजार रुपये याप्रमाणे तीन वर्षांसाठी एकूण ४ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला होता. त्यानंतर लागवडीसाठी करण्यात आलेल्या कुशल कामाचे बिल सादर करण्यात आले होते.
५० हजारांच्या बिलासाठी १५ टक्के मागणी
तक्रारदाराच्या ५० हजार रुपयांच्या देयकाचे बिल मंजूर करून देण्यासाठी वनपाल महाजन यांनी बिलाच्या रकमेच्या १५ टक्के प्रमाणे ७,५०० रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. तक्रारीची पडताळणी करताना २४ जून २०२६ रोजी पंच साक्षीदारांसमक्ष लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले.
एसीबीचा सापळा यशस्वी
पडताळणीनंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचून २४ जून रोजी आरोपी वनपालाला ७,५०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
अधिकाऱ्यांच्या पथकाची कारवाई
ही कारवाई पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक), पोलीस हवालदार विनोद चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल अनिल गांगोडे, पोलीस शिपाई योगेश शिंदे तसेच पोलीस निरीक्षक हेमंत नागरे (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव) यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
नागरिकांना एसीबीचे आवाहन
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी शासकीय कामासाठी लाचेची मागणी करत असल्यास त्वरित एसीबीशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी.









